VIDEO: संजू सॅमसनची चित्त्यासारखी झेप, सुपर कॅचची क्रिकेटविश्वात चर्चा
एबीपी माझा वेब टीम | 04 Aug 2017 11:56 AM (IST)
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या तिरंगी मालिकेत भारत अ संघाने दक्षिण आफ्रिका अ संघावर थरारक विजय मिळवला.
प्रिटोरिया (दक्षिण आफ्रिका): दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या तिरंगी मालिकेत भारत अ संघाने दक्षिण आफ्रिका अ संघावर थरारक विजय मिळवला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात, मनिष पांडेच्या नाबाद 93 धावांच्या जोरावर भारताने हा सामना एक विकेट राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकेने भारतासमोर 267 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे 9 फलंदाज तंबूत परतले होते. मात्र भारताचा फॉर्ममधील फलंदाज मनिष पांडेने एक बाजू लावून धरली. पांडेला सलामीवीर संजू सॅमसनने 68 धावा करुन चांगली साथ दिली. तर तळाचा फलंदाज कृणाल पांड्याने मोलाच्या 25 धावा करुन, भारताला विजयापर्यंत पोहोचण्यास मदत केली. मनिष पांडेने 85 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकार ठोकत नाबाद 93 धावा केल्या. त्यामुळे भारताने 49.4 षटकात 9 बाद 267 धावा केल्या. संजू सॅमसनची चित्त्यासारखी झेप संजू सॅमसनने फलंदाजीत कमाल दाखवलीच, पण तत्पूर्वी त्याने क्षेत्ररक्षणातही चुणूक दाखवली. संजूने एक लाजवाब झेल टिपला. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 25 व्या षटकात यजुवेंद्र चहल गोलंदाजी करत होता. त्यावेळी ड्वेन प्रीटोरियसने पॉईंटवरुन एक फटका मारला. मात्र संजू सॅमसनने मागे धाव घेत अक्षरश: चित्त्यासारखी झेप घेत झेल टिपला. संजूच्या या झेलची क्रिकेटवर्तृळात चांगलीच चर्चा रंगली आहे. VIDEO: https://twitter.com/ImAbhay03/status/893046054848999426