नवी दिल्ली : पाकिस्तान आणि श्रीलंका दरम्यानच्या टी-20 मालिकेसाठी शोएब मलिकला मॅन ऑफ द सिरीजने गौरवण्यात आलं. शोएबच्या या कामगिरीनंतर सानिया मिर्झाने शोएब मलिककडे एक गिफ्ट मागितलं. पण पाकिस्तानी खेळाडू शादाब खानला यावरुन सानियाची माफी मागावी लागली.


वास्तविक, पाकिस्तान आणि श्रीलंकेदरम्यान लाहौरमध्ये झालेल्या सामन्या पाहण्यासाठी सानिया मैदानात नेहमीप्रमाणे उपस्थित राहू शकली नाही. पण ती ट्वीटरच्या माध्यमातून ती शोएब आणि त्याच्या सहकार्यांना चिअरअप करत होती.

या सामन्यानंतर शोएबला मॅन ऑफ द सिरीजने गौरवण्यात आल्यानंतर, मालिकावीराचा किताब म्हणून शोएबला बाईक मिळाली होती. या बाईकवरुन तो ग्राऊंडवर रपेट मारत होता. यावेळी त्याच्या मागे पाकिस्तानी क्रिकेटपटू शादाब खान बसला होता.


सानियाने यावरुनच शोएबची ट्विटरवर फिरकी घेण्यास सुरुवात केली. सानियाने ट्विट केलं की, “चल... मलाही गाडीवरुन फिरायचं आहे!”



सानियाच्या ट्विटला रिप्लाय देताना शोएब म्हणाला की, “हो..हो... नक्कीच. तू तयार हो. मी आलोच.”


यानंतर तिने शोएब आणि शादाबचा फोटो रिट्वीट करुन त्यात म्हटलं की, “काही हरकत नाही. मला वाटतं आधीच तू कुणासोबत तरी फिरत आहेस.”



यानंतर शोएबने सानियाच्या ट्वीटला रिप्लाय देताना म्हटलं की, “नाही... नाही... मी त्याला मैदानातच सोडून आलो. कुणालाच फिरवत नाही.”


सानिया आणि शोएबची ट्विटरवरील ही चर्चा पाहून शादाबला खजिल झाल्यासारखं वाटलं. त्याने सानियाला ट्वीट करुन माफी मागितली. शादाब म्हणाला, “सॉरी भाभी!”

शादाबचं हे ट्वीट पूर्ण होईपर्यंत सानिया आणि शोएब यांच्यातील ही चर्चा सोशल मीडियावर कमालीची व्हायरल झाली होती.