महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला 21 व्या शतकातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून निवडले गेले आहे. स्टार स्पोर्ट्स पोलमध्ये सचिन तेंडुलकरने श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराचा 21 व्या शतकाच्या महान फलंदाजाच्या शर्यतीत पराभव केला. स्टार स्पोर्ट्सच्या कमेन्ट्री पॅनेलमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण, इरफान पठाण आणि आकाश चोप्रा या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता.


गावस्कर म्हणाले की, एकविसाव्या शतकातील महान फलंदाजांच्या शर्यतीत सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा यांच्यात चुरशीची स्पर्धा होती. सचिन तेंडुलकरने 8 वर्षांपूर्वी 2013 मध्येच कसोटी क्रिकेटला निरोप दिला होता. मात्र, आठ वर्षांनंतरही सचिन तेंडुलकरला या शतकाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून निवडण्यात आले आहे.






कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावावर फलंदाजीची जवळपास सर्वच रेकॉर्ड आहेत. सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये 15921 धावा केल्या असून दीर्घ फॉर्मटमध्ये सर्वाधिक धावा करणारा आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या कसोटी कारकीर्दीत 51 शतके ठोकली. जॅक कॅलिस हा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक शतके झळकावणा दुसरा (45 शतके) फलंदाज आहे.


वयाच्या 17 व्या वर्षी ठोकलं शतक
कसोटी क्रिकेटमध्ये संगकाराच्या नावावर 38 शतके आहेत आणि सर्वाधिक शतके ठोकणार्‍या खेळाडूंच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र, सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत संगकारा सहाव्या क्रमांकावर आहे.


सचिन तेंडुलकरने वयाच्या 16 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. इतकेच नव्हे तर वयाच्या 17 व्या वर्षी आणि 107 दिवसांच्या कालावधीत सचिन कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. 2002 मध्ये सचिन तेंडुलकरला विस्डमने जगातील दुसर्‍या क्रमांकाचा फलंदाज म्हणून निवडले.


सचिन हा जगातील एकमेव खेळाडू आहे, ज्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके आहेत. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.