मुंबई : देशभरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचं आदराचं आणि महत्त्वाचं स्थान असतं. गुरुपौर्णिमा म्हणजे खऱ्या अर्थाने गुरु प्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस असतो. सगळ्यांप्रमाणे भारताचा माजी क्रिकेटपट्टू भारतरत्न सचिन तेंडुलकरनेही गुरु रमाकांत आचरेकर सरांची भेट घेतली.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपले गुरु आचरेकर सरांची भेट घेऊन सचिनने त्यांचे आर्शीवाद घेतले. सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंट या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. आपल्या ट्विटमध्ये सचिनने म्हटलं की, "आचरेकर सर, तुमच्यामुळे हे सर्व शक्य झालं. तुमच्या मार्गदर्शनाशिवाय मी इतका मोठा पल्ला गाठूच शकलो नसतो. आपल्या गुरुंना विसरू नका, त्यांचा आर्शीवाद घ्या."
सचिनच्या जडणघडणीत आचरेकर सरांचं योगदान महत्त्वाचं आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकिर्दित अनेक मोठे विक्रम आपल्या नावे केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महान खेळाडूंमध्ये सचिनचा उल्लेख केला जातो. क्रिकेटमधील या योगदानाबद्दल भारत सरकारने सचिनला देशातील 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं आहे.