मुंबई : भारताचा विक्रमवीर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 27 मार्चला कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार सावधगीरीचा उपाय  म्हणून सचिन हॉस्पिटलमध्ये भरती झाला आहे. या संदर्भात स्वत: सचिनने ट्वीट करत माहिती दिली आहे. 


सचिन आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला, "माझ्या तब्येतीसाठी प्रार्थना करणाऱ्या आणि शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार. वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे. पुढील काही दिवसांमध्येच मी पुन्हा घरी येईन अशी अपेक्षा आहे. सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा."


भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आजच्या दिवसाला विशेष असं महत्व आहे. दहा वर्षापूर्वी, आजच्याच दिवशी टीम इंडियाने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली क्रिकेट विश्वचषकावर पुन्हा एकदा, तब्बल 28 वर्षानंतर आपलं नाव कोरलं होतं. सचिनने देखील सर्व सहकाऱ्यांच अभिनंदन केलं. "सर्व भारतीय आणि संघातील सर्व सहकाऱ्यांचं विश्वचषक विजयाला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन", असेही सचिन आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला. 






सचिनने स्वत: ट्वीट करत गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाल्याती माहिती दिली होती सचिनने स्वत:ला होम क्वारंटाईन केले होते. तसंच घरातील इतर सर्वांच्या कोविड चाचण्या या निगेटिव्ह आल्याचंही सचिननं सांगितलं आहे. 


नुकतचं सचिननं रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सहभाग घेतला होता. यात सचिनच्या नेतृत्वात इंडिया लिजेंड्सनं शानदार कामगिरी करत विजय मिळवला. या मालिकेत सचिननं देखील चांगली कामगिरी केली होती.