Rohit Sharma Video: अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माच्या फलंदाजीची सुरुवात वेदनादायक झाली. पहिल्याच षटकात अझमतुल्ला ओमरझाईच्या गोलंदाजीवर पुल शॉट मारण्याचा प्रयत्न करताना त्याच्या मनगटाला दुखापत झाली. चेंडू त्याच्या मनगटावर आदळल्याने तो वेदनेने विव्हळू लागला. वेदनेतून सावरल्यानंतर रोहित शर्माने अफगाण गोलंदाजांना सतावणे सुरूच ठेवले. धावबाद होण्यापूर्वी त्याने दोन चौकार आणि एका षटकारासह 16 चेंडूंमध्ये 16 धावा केल्या. या डावातील पहिल्या षटकारासह रोहित शर्माने एक मोठा टप्पा गाठला. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 16 हजार धावा पूर्ण केल्या. तो भारताचा सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. वीरेंद्र सेहवागच्या धावा त्याच्यापेक्षा जास्त आहेत, पण त्याने आशिया आणि आयसीसी इलेव्हन संघांकडून सलामीवीर म्हणून धावा केल्या आहेत.
सनथ जयसूर्या यादीत अव्वल
सनथ जयसूर्याच्या नावावर सलामीवीर म्हणून सर्वाधिक 19 हजारहून अधिक धावा करण्याचा विक्रम आहे. ख्रिस गेल आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या प्रत्येकी 18 हजारपेक्षा जास्त धावा आहेत. वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू डेसमंड हेन्स, वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांच्या 16 हजारपेक्षा जास्त धावा आहेत. सचिन तेंडुलकर, तमीम इक्बाल आणि अॅलिस्टर कूक यांच्या 15 हजारपेक्षा जास्त धावा आहेत.
धर्मशालात रोहित शर्माने इतिहास रचला
रोहित 50 षटकांचा सामना खेळणारा सर्वात वयस्कर भारतीय खेळाडू ठरला. रोहित सध्या 39 वर्षे आणि 44 दिवसांचा आहे. त्याने मोहिंदर अमरनाथ यांना मागे टाकले, जे 39 वर्षे आणि 36 दिवसांच्या वयात एकदिवसीय सामने खेळले होते. अमरनाथ यांनी आपला शेवटचा एकदिवसीय सामना 1989 मध्ये खेळला होता. हा टप्पा रोहितच्या शानदार आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आणखी एक मोठी उपलब्धी आहे. तो भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आणि फलंदाज बनला आहे. मात्र, एकदिवसीय सामने खेळणारा रोहित हा सर्वात वयस्कर भारतीय खेळाडू नाही.
हा विक्रम झुलन गोस्वामीच्या नावावर
हा विक्रम भारताची माजी महिला वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या नावावर आहे, झुलनने 2022 मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध वयाच्या 39 वर्षे आणि 303 दिवसांनी आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. विशेष म्हणजे, वयाच्या 40 वर्षांनंतर कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूने एकदिवसीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केलेले नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
