नवी दिल्ली : 'हिटमॅन' रोहित शर्माने भारताकडून सर्वाधिक ट्वेन्टी ट्वेन्टी सामने खेळण्याचा विक्रम रचला. दिल्लीतील बांगलादेशविरुद्धचा टी ट्वेन्टी सामना हा रोहितच्या कारकीर्दीतला 99 वा सामना ठरला. त्याने याबाबतीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकलं आहे. धोनीने आजवर 98 आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानंतर सुरेश रैना 78 आणि विराट कोहलीने 72 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.

भारत आणि बांगलादेश संघांमध्ये आज खेळवण्यात येत असलेल्या आजच्या सामन्याला एक खास महत्व आहे. कारण उभय संघातला हा सामना पुरुषांच्या ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला एक हजारावा सामना आहे. 17 फेब्रुवारी 2005 साली पुरुषांच्या टी ट्वेन्टी क्रिकेटमधला पहिला सामना खेळवण्यात आला होता. त्यानंतर गेल्या 14 वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 999 सामने खेळवण्यात आले आहेत.

मुंबईकर शिवम दुबेचं भारतीय संघात पदार्पण

मुंबईच्या शिवम दुबेने भारताकडून ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. भारताकडून टी-20 खेळणारा शिवम दुबे हा भारताचा 82 वा तर मुंबईचा नववा खेळाडू ठरला. सामन्याच्या नाणेफेकीआधी कर्णधार रोहित शर्माच्या हस्ते शिवमला कॅप देण्यात आली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळणारा शिवम दुबे हा आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. यंदाच्या आयपीएलमध्ये त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचं नेतृत्व केलं होतं.