मेलबर्न : स्वित्झर्लंडचा टेनिसस्टार रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीत सहाव्यांदा विजेतेपद मिळवलं आहे. फेडररनं अंतिम सामन्यात क्रोएशियाच्या मरिन चिलीचवर मात केली. वयाच्या 36 व्या वर्षी त्याने विसावं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावलं आहे.

6-2, 6-7, 6-3, 3-6, 6-1 अशा पाच सेट्समध्ये मरिन चिलीचवर मात करण्यासाठी रॉजरला तीन तास तीन मिनिटांचा अवधी लागला. अशाप्रकारे फ्रेडीने वर्षातलं पहिलं ग्रँडस्लॅम जेतेपद खिशात घातलं. गेल्या वर्षी राफेल नादालला नमवून फ्रेडररने ऑस्ट्रेलियन ओपनचं टायटल जिंकलं होतं. यंदा हे टायटल आपल्या नावावर कायम ठेवण्यात तो यशस्वी ठरला.

ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीत फेडररने सहाव्यांदा विजेतेपद मिळवलं आहे. फेडररशिवाय सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि रॉय इमर्सन यांना प्रत्येकी सहा वेळा हा किताब पटकवला आहे. रॉजरने सातवेळा अंतिम फेरी गाठली असून त्यापैकी सहा जेतेपदं मिळवली आहेत. फेडररच्या कारकीर्दीतलं हे विसावं ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरलं.

फेडररची ग्रँडस्लॅम जेतेपदं

ऑस्ट्रेलियन ओपन : 6

फ्रेंच ओपन : 1

विम्बल्डन : 8

यूएस ओपन : 5
पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन आणि दुसरं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकवण्याचं मरिन चिलीचचं स्वप्न फेडररने धुळीस मिळवलं. चिलीचने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली होती.