मुंबई: रायझिंग पुणेनं आयपीएलच्या रणांगणात मुंबई इंडियन्सच्या तुलनेत आपण सुपरजायंट असल्याचं पुन्हा सिद्ध केलं. पुण्यानं क्वालिफायर वन सामन्यात मुंबईचा 20 धावांनी पराभव करून, पहिल्यांदाच आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली. मुंबईला आता फायनलमध्ये खेळण्यासाठी क्वालिफायर टूचा सामना जिंकावाच लागेल.
दरम्यान, वानखेडेवरच्या सामन्यात पुण्यानं दिलेलं 163 धावांचं आव्हान गाठणंही मुंबईला झेपलं नाही. वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूरनं प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडून मुंबईला 20 षटकांत 9 बाद 142 धावांत रोखलं.
त्याआधी, पुण्यानं 20 षटकांत चार बाद 162 धावांची मजल मारली होती. अजिंक्य रहाणेनं मनोज तिवारीच्या साथीनं 80 धावांची भागीदारी रचून पुण्याच्या डावाला आकार दिला. रहाणेनं 43 चेंडूंमध्ये पाच चौकार आणि एका षटकारासह 56 धावांची, तर मनोज तिवारीनं 48 चेंडूंमध्ये चार चौकार आणि दोन षटकारांसह 58 धावांची खेळी केली.
महेंद्रसिंग धोनीनं 26 चेंडूंमध्येच पाच षटकारांसह नाबाद 40 धावांची खेळी रचून पुण्याच्या डावाला बळकटी दिली.