बंगळुरु : रायझिंग पुणेने विराट कोहलीच्या बंगळुरुला 134 धावांत रोखून बंगळुरूच्या आयपीएल सामन्यात 27 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. पुण्याचा हा पाच सामन्यांमधला केवळ दुसरा विजय ठरला. या सामन्यात पुण्याने बंगळुरुला विजयासाठी 20 षटकांत 162 धावांचं आव्हान दिलं होतं.


पुण्याने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, केदार जाधव आणि शेन वॉटसनसारख्या धडाकेबाज फलंदाजांचा समावेश असूनही बंगळुरुला 20 षटकांत 9 बाद 134 धावांचीच मजल मारता आली.

पुण्याच्या पहिल्या चार फलंदाजांना चांगला स्टार्ट मिळाला. अजिंक्य रहाणे आणि राहुल त्रिपाठीने सलामीला 63 धावांची, तर स्टीव्ह स्मिथ आणि महेंद्रसिंग धोनीने तिसऱ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी रचली. पण पुण्याला त्याचा लाभ उठवता आला नाही.

अखेर मनोज तिवारीने हाणामारीच्या षटकांत 11 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांसह 27धावा फटकावून पुण्याला 20 षटकांत आठ बाद 161 धावांची मजल मारून दिली. त्यात रहाणेने 30, त्रिपाठीने 31, स्मिथने 27 आणि धोनीने 28 धावांचा वाटा उचलला.

पुण्याच्या गोलंदाजांनीही मोलाची भूमिका निभावली. शार्दूल ठाकूरने चार षटकात 35 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तर बेन स्टोक्सनेही तिन फलंदाजांना माघारी धाडलं. शिवाय इम्रान ताहीर 1 आणि जयदेव उनादकटने घेतलेल्या 2 विकेट्सच्या जोरावर बंगळुरुच्या फलंदाजांना 134 धावांवरच रोखता आलं.