नवी दिल्ली : सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये युवा फलंदाज ऋषभ पंतने मोठा विक्रम केला आहे, जो आतापर्यंत एकाही भारतीय फलंदाजाला करता आलेला नाही. त्याने केवळ 32 चेंडूत शतक पूर्ण करत टी-20 क्रिकेटमधील दुसरं सर्वात वेगवान शतक ठोकलं.


मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीच्या नॉर्थ झोन सामन्यात दिल्लीने हिमाचल प्रदेशवर 10 विकेट्सने मात केली. हा सामना ऋषभ पंतच्या खेळीने एकतर्फी झाला.

दिल्लीने नाणेफेक जिंकून हिमाचल प्रदेशला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. हिमाचलने दिल्लीला विजयासाठी 20 षटकांमध्ये 145 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीने 11.4 षटकांमध्येच विजय मिळवला.

ऋषभ पंतने 38 चेंडूत 8 चौकार आणि 12 षटकारांच्या मदतीने 116 धावा ठोकल्या. ऋषभ पंतने केवळ 32 चेंडूत शतक पूर्ण करत टी-20 क्रिकेटमधील दुसरं सर्वात वेगवान शतक पूर्ण केलं. एवढंच नाही, तर तो सर्वात वेगवान शतक ठोकणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे.

रोहित शर्माने गेल्या वर्षी 35 चेंडूंमध्ये केलेल्या शतकाचा विक्रमही मोडित काढला. ऋषभ पंतच्या पुढे आता केवळ ख्रिस गेल आहे. गेलने 2013 सालच्या आयपीएल मोसमात पुणे वॉरियर्सविरुद्ध खेळताना 30 चेंडूत शतक पूर्ण केलं होतं.

ऋषभ पंतने भारतीय संघाचंही प्रतिनिधत्व केलेलं आहे. ऋषभ पंत आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळतो. दिल्लीने त्याला या मोसमात पुन्हा एकदा रिटेन केलं आहे.