साऊदम्पटन : षटकाराने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या रिषभ पंतने दुसऱ्या कसोटी सामन्यात असा विक्रम केला, जो तो कधीही विसरु शकणार नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील साऊदम्पटनमध्ये खेळवण्यात आलेल्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ पहिल्या डावात 273 धावांवर बाद झाला. या डावात चेतेश्वर पुजाराने आपल्या कसोटी कारकीर्दीतलं पंधरावं शतक पूर्ण केलं. भारताला अडचणीतून बाहेर आणण्यात त्याने मोलाची भूमिका निभावली. दुसरीकडे टीम इंडियाला जेव्हा रिषभ पंतची गरज होती, तेव्हा त्याला काहीही करता आलं नाही आणि 47 मिनिटे खेळल्यानंतर तो शून्यावर बाद झाला. रिषभ पंत 47 मिनिटे खेळपट्टीवर होता. त्याने 29 चेंडूंचा सामना केला, मात्र खातंही उघडता आलं नाही. अखेर 29 व्या चेंडूवर तो शून्यावर बाद झाला. बाद झाल्यानंतर त्याच्या नावावर असा विक्रम नोंदवला गेला, जो नोंदवून घेण्याची कोणत्याही फलंदाजाची इच्छा नसेल. रिषभने एका कसोटीत सर्वात जास्त चेंडू खेळून खातं न उघडता बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इरफान पठाण आणि सुरेश रैना यांच्या विक्रमाची बरोबरी केली. रिषभपूर्वी इरफान पठाणने यापूर्वी 2005 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 29 चेंडूंचा सामना केला, पण खातं न उघडताच तो बाद झाला होता. सुरेश रैनानेही 2011 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत 29 चेंडू खेळून खातंही उघडलं नव्हतं. आता पठाण आणि सुरेश रैनाच्या यादीत रिषभ पंतचा समावेश झाला आहे.