मुंबई: ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली हा जगभरातील प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक. जगभरातील अव्वल फलंदाजही त्याच्या गोलंदाजीवर खेळण्यास अडखळत होते.


आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला ब्रेट ली सध्या समालोचक अर्थाक कॉमेंटेटरची भूमिका साकारत आहे. मात्र अजूनही मैदानात उतरण्यासाठी तो नेहमीच तयार असतो.

41 वर्षीय ब्रेट लीने नुकतंच वेश बदलून मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात हजेरी लावली. एका वृद्धाचं रुप परिधान केलेल्या ब्रेट लीने, लहानग्यांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.

एक वृद्ध क्रिकेट खेळण्यासाठी आला आहे,  हे पाहून लहान मुलं त्याला टिप्स देत होते. आधी ब्रेट लीनेही आपल्याला काहीच क्रिकेट कळत नसल्याचं दाखवलं.

मात्र मुलांकडून टिप्स घेतल्यानंतर, त्याने आपलं क्रिकेटमधील कौशल्य दाखवलं. ब्रेट लीने बॅटिंग करताना मोठे फटके मारले, तर बोलिंगवेळी अनेकांच्या दांड्या गुल केल्या.

आजोबांची एवढ्या कमी वेळात इतकी जलद प्रगती पाहून, उपस्थित मुलं चांगलीच अवाक् झाली.

मग मुलांनी त्या आजोबांवर प्रश्नांचा भडीमार करत, तुम्ही इतकं चांगलं क्रिकेट कसं खेळता, अशी विचारणा केली.

त्यावर ब्रेट लीने खोटी दाढी, नकली केस काढून, आपलं खरं रुप दाखवलं.

आपल्या समोर चक्क ब्रेट ली आहे हे पाहून मुलं आश्चर्य चकीत झाली. त्यांनी ब्रेट लीची ऑटोग्राफ घेण्यासाठी एकच झुंबड उडवली.

ब्रेट लीचा हाच व्हिडीओ आयसीसीने ट्विट केला आहे.

VIDEO: