नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या वन डे आणि टी-20 मालिकेतून बाहेर असलेल्या ऑल राऊंडर रवींद्र जाडेजाने नवा इतिहास रचला आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतर जिल्हा टी-20 सामन्यात खेळताना त्याने सहा चेंडूत सहा षटकार ठोकून नवा विक्रम केला.


रवींद्र जाडेजाने 64 चेंडूत 154 धावांची वादळी खेळी केली. यामध्ये 15 चौकार आणि 10 षटकारांचा समावेश होता. याच धावसंख्येच्या बळावर जाडेजाचा संघ जमानगरने अमेरेलीला 121 धावांच्या मोठ्या अंतराने मात दिली.

दिव्यराज चौहानसोबत सलामीला उतरलेला जाडेजा 19 व्या षटकात बाद झाला. या सामन्यातील 15 व्या षटकात ऑफ स्पीनर नीलम वमजाच्या गोलंदाजीवर त्याने सलग सहा षटकार ठोकले. वमजाच्या दोन षटकांमध्ये एकूण 48 धावा काढण्यात आल्या.

यापूर्वी जाडेजाला श्रीलंका दौऱ्यातून बाहेर ठेवण्यात आलं तेव्हा त्याने रणजी सामन्यात द्विशतक ठोकलं होतं. आता पुन्हा एकदा त्याला होम सीरिजमधून बाहेर ठेवल्यानंतर त्याने ही कामगिरी करुन निवडकर्त्यांना उत्तर दिलं आहे.