जमैका : जमैका कसोटीच्या तिसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणेने शानदार शतक झळकावलं. रहाणेचं कसोटी कारकीर्दीतलं हे सातवं, तर गेल्या तीन कसोटी सामन्यांमधलं हे तिसरं शतक ठरलं. रहाणेने 237 चेंडूंत 13 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 108 धावांची खेळी रचली.
याशिवाय रहाणेने कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी केली आहे जी कोणत्याही खेळाडूला अद्याप करता आलेली नाही.
या सामन्यात 147व्या षटकांत देवेंद्र बिशूच्या गोलंदाजीवर राजेंद्र चंद्रिकाने रहाणेचा झेल सोडून त्याला जीवदान दिलं. त्यावेळी रहाणे 65 धावांवर खेळत होता. चंद्रिकाने दिलेल्या या जीवदानाचा रहाणेने पुरेपूर फायदा उचलला आणि शतक साजरं केलं.
दरम्यान अजिंक्य रहाणे 2013 पासून भारतासाठी सलग आठ कसोटी मालिका खेळल्या आहेत. या सलग आठ कसोटी मालिकेत किमान एकातरी डावात 90 किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा पराक्रम गाजवला आहे. अशी कामगिरी करणारा रहाणे हा आजवरचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.