नानजिंग (चीन) : पी व्ही सिंधूने जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली आहे. तिने उपांत्य सामन्यात जपानच्या अकाने यामागुचीचं कडवं आव्हान 21-06, 24-22 असं मोडीत काढलं. त्यामुळे आता अंतिम फेरीत सिंधूचा सामना दोन वेळच्या माजी विजेत्या स्पेनच्या कॅरोलिना मरीनशी होणार आहे.


2017 च्या ग्लासगोमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सिंधू आणि नोझोमी ओकुहारा ही जोडी अंतिम सामन्यात भिडली होती. पण त्यावेळी ओकुहारानं सिंधूचा संघर्ष तीन सेट्समध्ये मोडीत काढत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं होतं. तो पराभव बाजूला सारुन जागतिक अजिंक्यपदाच्या या स्पर्धेत भारताला पहिलंवहिलं सुवर्णपदक जिंकून देण्याची संधी सिंधूसमोर पुन्हा एकदा चालून आली आहे.

सिंधूनं आजवरच्या कारकीर्दीत या स्पर्धेची तीन पदकं पटकावली आहेत. त्यात 2013 आणि 2014 साली कांस्य तर 2017 च्या रौप्यपदकाचा समावेश आहे. पण जागतिक अजिंक्यपदाच्या सोनेरी यशानं तिला वारंवार हुलकावणी दिलीये. त्यामुळे जिनपिंगच्या बॅडमिंटन कोर्टवर पहिल्या सुवर्णपदकाची संधी तिला खुणावत असेल.

यंदाच्या वर्ष सिंधूसाठी विजेतेपदाच्या दृष्टीनं निराशाजनक ठरलं. इंडिया ओपन आणि थायलंड ओपनमध्ये अंतिम फेरीत धडक मारुनही विजेतेपद तिच्यापासून केवळ एक पाऊल दूर राहिलं. त्यामुळे सिंधू जागतिक अजिंक्यपदाच्या या अंतिम मुकाबल्यात ऐतिहासिक कामगिरी बजावून भारताला पहिलं सुवर्ण मिळवून देणार का याकडे चाहच्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.