मुंबई: भारताच्या अंडर नाईन्टिन विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ आज जेमतेम साडेअठरा वर्षांचा आहे. पण याच वयात त्याच्या फलंदाजीनं भल्याभल्यांना भुरळ घातली आहे.


पृथ्वी शॉच्या फलंदाजीच्या प्रेमात पडलेला नवा दिग्गज ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीवीर मार्क वॉ आहे. या मार्क वॉनं पृथ्वी शॉची तुलना थेट सचिन तेंडुलकरशी केली आहे.

मुंबईचा उदयोन्मुख फलंदाज पृथ्वी शॉ...आणि मूळचा मुंबईचाच, पण जगाचा मास्टर ब्लास्टर ठरलेला सचिन तेंडुलकर.

आयपीएल सामन्यांच्या समालोचनासाठी भारतात आलेल्या मार्क वॉला पृथ्वी शॉ आणि सचिन तेंडुलकर या दोघांच्या तंत्रात कमालीचं साम्य आढळून आलं आहे.

पृथ्वी शॉचं तंत्र सचिनशी साधर्म्य साधणारं

आयपीएलच्या रणांगणात पृथ्वी शॉ हा दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळतो. दिल्ली-राजस्थान सामन्यात मार्क वॉला पृथ्वी शॉच्या फलंदाजीचा आनंद लुटता आला. त्यानंतर स्टार स्पोर्टस सिलेक्टच्या डगआऊट कार्यक्रमात , बोलताना मार्क वॉ म्हणाला की, पृथ्वीची फलंदाजी पाहताना प्रकर्षानं जाणवलेली बाब म्हणजे त्याचं तंत्र हे सचिनशी साधर्म्य सांगणारं आहे.

सचिन तेंडुलकरच्याच जमान्यातला ऑस्ट्रेलियाचा मोस्ट स्टायलिश बॅट्समन ही मार्क वॉची पहिली ओळख आहे. मग 128 कसोटी सामन्यांमध्ये 8029 धावा, आणि 244 वन डे सामन्यांमध्ये 8500 धावा ही आकडेवारी समोर आली की, आजच्या पिढीला मार्क वॉच्या थोरवीची कल्पना येईल. त्यामुळं मार्क वॉला पृथ्वी शॉच्या तंत्रात सचिनचा भास होत असेल, तर तो पृथ्वी शॉचा नक्कीच गौरव ठरावा.



सचिनचा भास

मार्क वॉ म्हणतो... पृथ्वीची ग्रिप, त्याचा स्टान्स, पायांची हालचाल करण्याआधी त्याचं क्रीजमध्ये स्थिर उभं राहणं आणि खेळपट्टीच्या साऱ्या दिशांना फटके खेळण्याची त्याची हातोटी यात सचिनचाच भास होतो. पृथ्वीकडे प्रत्येक फटका खेळण्यासाठी मुबलक वेळ आहे. त्यामुळं तो शक्य तितका उशिरा खेळतो. तो दिसतो छोटासा, पण त्याच्या फटक्यामागची ताकद अफाट असते. समोरच्या गोलंदाजाला हवा तो फटका खेळण्याच्या दृष्टीनं त्याच्या फलंदाजीचा पाया भक्कम आहे.

भारताला अंडर नाईन्टिनचा विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार आणि भारताचा उदयोन्मुख फलंदाज म्हणून पृथ्वी शॉनं करोडो क्रिकेटरसिकांच्या मनात आधीच आपलं स्थान निर्माण केलं आहे. त्यात मार्क वॉच्या या स्तुतीसुमनांनी त्याच्यावरचं अपेक्षाचं ओझं दुपटीनं वाढवलं आहे.