राजकोट : मुंबईच्या पृथ्वी शॉने राजकोट कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खणखणीत शतकी पदार्पण केलं. अवघ्या 18 वर्षाच्या पृथ्वीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या आणि पदार्पणाच्या कसोटीतच शतक झळकावलं. विंडीज गोलंदाजांनी पृथ्वी शॉच्या फलंदाजीसमोर अक्षरश: प्रदक्षिणा घातली. फिरकी असो की वेगवान गोलंदाज पृथ्वी शॉने विंडीज गोलंदाजांवर तुफान हल्ला चढवत शतक झळकावलं.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणात शतक ठोकणारा पृथ्वी शॉ हा पंधरावा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने 99 चेंडूंत 15 चौकारांच्या मदतीने आपलं शतक साजरं केलं.
या शतकासह पृथ्वी शॉने अनेक विक्रम मोडीत काढले. पृथ्वी शॉने रणजी चषक, दुलीप करंडक आणि कसोटी या सर्वप्रकारच्या क्रिकेटमधील पदार्पणाच्या सामन्यात शतकं ठोकली आहेत.

या दमदार कामगिरीनंतर पृथ्वी शॉवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुंबईतील त्याच्या घराशेजारी चाहत्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या. "आज शॉचा शो होता. अभिनंदन पृथ्वी शॉ, अभी तो बस शुरुआत है, लड़के में बहुत दम है" (ही तर सुरुवात आहे, मुलामध्ये खूप दम आहे) असं सेहवागने लिहिलं आहे.


पृथ्वी शॉ - हा मुलगा क्लास आहे आणि तो लंबी रेस का घोडा आहे, त्याला खेळताना पाहून आनंद झाला.


वॉव....18 वर्षांचा पृथ्वी शॉ...कसोटीत शतकी पदार्पण. भारताला आणखी एका सुपरस्टार मिळाला असं दिसतंय


तो आला, त्याने दाखवलं आणि तो जिंकला, अभिनंदन पृथ्वी शॉ, जबरदस्त पदार्पण, दमदार शतक


जेव्हा आपण पृथ्वी शॉला पाहतो, तेव्हा सगळ्यांना गावसकर, सेहवाग, तेंडुकरची आठवण होते. पण या युवा खेळाडूला त्याचं स्वत:चं श्रेय देऊया. शालेय क्रिकेटपासून त्याच्याकडे उत्कृष्ट कौशल्य आहे. महानता जन्मत: असते आणि तयारही केली जाते.


पृथ्वी शॉचं कसोटी पदार्पण, भारतीय क्रिकेटसाठी अभिमानाचा क्षण, अभिनंदन पृथ्वी शॉ आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा