प्रणव धनावडेने एमसीएची स्कॉलरशिप नाकारली
एबीपी माझा वेब टीम | 08 Nov 2017 01:04 PM (IST)
कल्याण शहरात खेळासाठी पोषक सुविधा नसल्याचं कारण त्याने दिलं आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत.
कल्याण : एका डावात तब्बल 1009 धावा ठोकत क्रिकेटमध्ये विश्वविक्रम करणाऱ्या कल्याणच्या प्रणव धनावडेने एमसीएची (मुंबई क्रिकेट असोसिएशन) स्कॉलरशिप परत केली आहे. कल्याण शहरात खेळासाठी पोषक सुविधा नसल्याचं कारण त्याने दिलं आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात आंतरशालेय सामन्यात खेळताना प्रणवने अवघ्या 323 चेंडूंमध्ये तब्बल 1009 धावा काढल्या होत्या. ज्यात 59 षटकार आणि 129 चौकारांचा समावेश होता. यानंतर त्याच्या कामगिरीची दखल घेत एमसीएने त्याला 5 वर्षांसाठी महिना 10 हजार रुपयांची स्कॉलरशिप दिली होती. वर्षभर ही स्कॉलरशिप प्रणवने स्वीकारली, मात्र यंदाच्या वर्षांपासून त्याने ही स्कॉलरशिप नाकारली आहे. कल्याण शहरात खेळासाठी पुरेशा सुविधा नसून ज्या मैदानात प्रणवने हा विश्वविक्रम केला, त्या मैदानाची अवस्था आज बिकट झाली आहे. त्यामुळे साहजिकच प्रणवच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे. जर कामगिरीच देऊ शकत नसेल, तर स्कॉलरशिप का घ्यायची? असा विचार करून प्रणवने ही स्कॉलरशिप नाकारली आहे. प्रणवचे वडील प्रशांत धनावडे यांनी याबाबत कालच एमसीएला पत्र दिलं असून स्कॉलरशिप स्थगित करण्याची मागणी केली आहे. एबीपी माझाशी बोलताना या सगळ्याला केडीएमसी आणि स्थानिक राजकारण्यांची उदासिनता कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावर केडीएमसीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी मात्र प्रणवला असा टोकाचा निर्णय न घेण्याची विनंती केली आहे. संबंधित बातम्या :