मुंबई : टीम इंडिया सध्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत व्यस्त आहे. 2 डिसेंबर रोजी या मालिकेतील अखेरचा कसोटी सामना खेळवण्यात आला. भारतासाठी हा दिवस खास आहे. कारण, संघ आणि दिवस तोच आहे, जेव्हा भारताने पहिल्यांदा आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये अव्वल क्रमांक मिळवला होता.


भारताने श्रीलंकेला मुंबई कसोटीत एक डाव आणि 24 धावांनी मात देत पहिल्यांदा आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवलं होतं. 2003 साली पहिल्यांदा आयसीसी रँकिंगची सुरुवात करण्यात आली. भारत सध्या कसोटीत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. मात्र भारताला पहिल्यांदा पहिल्या क्रमांकावर आणणारे खेळाडू सध्या काय करतात, हे तुम्हाला माहित आहे का?

मुरली विजय


मुरली विजयने त्या कसोटीत 87 धावांची खेळी केली होती. त्याने पहिल्या विकेटसाठी 221 धावांची भागीदारी केली. मुरली विजय सध्याच्या संघात त्या संघातील एकमेव खेळाडू आहे.

वीरेंद्र सेहवाग

भारताचा स्फोटक सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने मुंबई कसोटीत 293 धावांची तुफान खेळी केली होती. 293 धावांवर सेहवाग बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या 2 बाद 458 होती. सेहवागने 2013 साली निवृत्ती घेतली. सध्या तो समालोचकाच्या भूमिकेत दिसतो.

राहुल द्रविड

द वॉल म्हणून ओळख असणाऱ्या राहुल द्रविडने त्या सामन्यात सेहवागसोबत 237 धावांची भागीदारी केली होती. यामध्ये द्रविडच्या 74 धावांचा समावेश होता. द्रविडने 2012 साली निवृत्तीची घोषणा केली. सध्या तो भारत अ संघ आणि अंडर 19 संघाचा प्रशिक्षक आहे.

सचिन तेंडुलकर

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं आणि धावा असणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्या कसोटीत 53 धावांची खेळी केली होती. सचिन सध्या राज्यसभेचा खासदार आहे. 2013 साली त्याने क्रिकेटला अलविदा केलं.

व्हीव्हीएस लक्ष्मण

भारताचा सर्वोत्कृष्ट कसोटी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मणने त्या कसोटीत 63 धावांची खेळी केली होती. द्रविडसोबत निवृत्ती घेणारा लक्ष्मण सध्या समालोचक आणि भारतीय संघासाठी प्रशिक्षक निवडणाऱ्या क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य आहे. ज्यामध्ये सचिन आणि सौरव गांगुली यांचा समावेश आहे.

युवराज सिंह

युवराज सिंहसाठी ती मालिका चांगली ठरली होती. मात्र भारतीय संघ पहिल्यांदा अव्वल क्रमांकावर विराजमान झाला त्या सामन्यात युवराजने केवळ 23 धावा केल्या होत्या. तेव्हापासून आतापर्यंत युवराज एकही कसोटी सामना खेळलेला नाही. सध्या तो वन डे संघातून बाहेर आहे.

महेंद्र सिंह धोनी

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने त्या सामन्यात नाबाद शतकी खेळी केली होती. अखेरच्या विकेटसाठी त्याने प्रज्ञान ओझासोबत मिळून 56 धावांची अभेद्य भागीदारी करत धावसंख्या 726 पर्यंत नेली. धोनीने कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. मात्र तो भारतीय वन डे आणि टी-20 संघाचा सदस्य आहे.

हरभजन सिंह

कसोटीत 400 पेक्षा जास्त विकेट पूर्ण करणाऱ्या हरभजन सिंहने त्या सामन्यात पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 2 अशा एकूण सहा विकेट घेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली होती. हरभजन सध्या भारतीय संघातून बाहेर आहे.

झहीर खान

भारताचा जलदगती गोलंदाज झहीर खानने त्या सामन्यात आपल्या स्विंगने श्रीलंकेच्या फलंदाजांची भंबेरी उडवली होती. दुसऱ्या डावात त्याने पाच विकेट घेतल्या. झहीरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो समालोचकाच्या भूमिकेत दिसतो.

प्रज्ञान ओझा

फिरकीपटू प्रज्ञान ओझा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं नेमकं कशात बिघडलं, याचं उत्तर कुणीही देऊ शकत नाही. त्या सामन्यात त्याने पहिल्या डावातील 3 विकेटसह एकूण पाच विकेट घेतल्या होत्या. सचिनने संन्यास घेतला, त्या सामन्यापासून ओझा भारतीय संघातून बाहेर आहे.

एस. श्रीशांत

एस. श्रीशांतसाठी हा सामना निराशाजनक ठरला होता. त्याला केवळ दोन विकेट घेता आल्या. काही वर्षांनी त्याच्यावर आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी क्रिकेट खेळण्यावर बीसीसीआयने बंदी घातली, ज्याविरोधात सध्या तो कोर्टात लढत आहे.