सिडनी : ऑस्ट्रेलियन फलंदाज फिल ह्यूग्जच्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी कोणालाही जबाबदार ठरवण्यात येणार नाही. ह्यूग्जच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याने हा निष्कर्ष काढला आहे.

'त्या दिवशी 23 बाऊन्सर्स टाकण्यात आले. त्यापैकी 20 बाऊन्सरना फिल सहज सामोरा गेला. त्यामुळे बाऊन्सर टाकण्याची शैली त्याच्या मृत्यूला कारणीभूत आहे असं वाटत नाही' असं चौकशी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर शेल्फील्ड शील्ड सामन्यादरम्यान शॉन अॅबॉटचा बाऊन्सर फिलीप ह्यूग्जच्या डोक्यावर आदळला होता. दोन दिवसांनंतर म्हणजेच 27 नोव्हेंबर 2014 रोजी उपचारादरम्यान 25 वर्षांच्या ह्यूग्जचा मृत्यू झाला.

'अबॉटने टाकलेल्या बाऊन्सरबाबत अंदाज चुकल्यामुळे चेंडू ह्यूग्जच्या मानेवर आदळला. परिणामी त्याचा मृत्यू ओढावला' असंही अहवालात म्हटलं आहे.

ह्यूग्जच्या कुटुंबीयांनी मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अखिलाडूवृत्तीमुळेच आपल्या लेकाचा जीव गेल्याची भावना ह्यूग्ज परिवारात आहे.

ह्यूग्जच्या मृत्यूनंतर क्रिकेटपटूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावलं उचलण्यात आली आहेत. मात्र नव्याने तयार करण्यात आलेल्या हेल्मेट्सची रचना पाहता, ह्यूग्जचा जीव वाचू शकला असता का, याबाबत संबंधित अहवालात शंका व्यक्त करण्यात आली आहे.