शतकवीर केदारसोबतची भागीदारी दीर्घकाळ लक्षात राहिल, असं कोहली म्हणाला.
विराट कोहलीनंही विजयाचं श्रेय केदार जाधवच्या खेळीलाच दिलं. कोहलीने 122 आणि केदार जाधवने अवघ्या 76 चेंडूत 120 धावा ठोकल्या. त्यामुळे भारताने हा सामना 3 विकेट्स आणि 11 चेंडू राखून सहज जिंकला.
पुण्याच्या मैदानात कर्णधार विराट कोहली आणि मराठमोळा वीर केदार जाधव या दोघांनी पाचव्या विकेटसाठी शानदार भागीदारी रचली. त्यामुळंच एका क्षणी 4 बाद 63 अशी अवस्था झाल्यावरही भारतानं पहिल्या वन डेत विजय साजरा केला.
विजय विस्मरणात जाणार नाही
यानंतर कोहली म्हणाला, "हा विजय सहजासहजी विस्मरणात जाणार नाही. आम्ही आधी 350 धावा दिल्या त्यानंतर 60 धावांच्या आसपास चार विकेट गमावल्या. त्यामुळे इंग्लंडचे गोलंदाज दबदबा निर्माण करत होते. अशावेळी चांगल्या भागीदारीची गरज होती. केदारने महत्त्वाची आणि आश्वासक खेळी केली. 4 बाद 63 अशी दयनीय स्थिती झाली असताना, केदार मैदानात आला. त्यावेळी आपल्याला 150 पर्यंत विकेट टिकवायची आहे, त्यानंतर इंग्लंडचे खेळाडू आपोआप चिंताग्रस्त होतील, असं मी केदारला सांगितलं. मग केदारने लगावलेले फटके पाहून मी आश्चर्यचकीत झालो. चोरट्या धावा घेण्यासाठी मी त्याला खूप पळवलं. पण त्याने उत्तम फलंदाजी केली".
केदारकडे खूप क्षमता आहे. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन गरजेच्यावेळी शतक ठोकणं हे खूपच खास आहे. केदारने त्याच्या कुटुंबासमोर, घरच्या मैदानात ठोकलेल्या शतकामुळेच टीम इंडिया विजयपथापर्यंत पोहोचली, असं कोहलीने नमूद केलं.
केदार जाधवच्या याच आश्वासक खेळीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
देशासाठी खेळल्याचा अभिमान - केदार जाधव
यावेळी केदार जाधव म्हणाला, "माझ्या घरच्या मैदानात, कुटुंबासमोर मी एक उत्तम खेळी करुन मी देशासाठी सामना जिंकला याचा मला अभिमान आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या संघाला जिंकवता, देशाचा अभिमान वाढवता, तेव्हा ती खूपच मोठी बाब असते".
या सामन्यासाठी केदार जाधवचे आई-वडिल, पत्नी आणि मुलगीही आली होती. त्यांच्यासमोर केदार जाधवने शतक ठोकून त्यांना अनोखी मानवंदना दिली.
कोहलीचे आभार
याशिवाय केदार जाधवने कर्णधार कोहलीचेही आभार मानले.
"मोठं लक्ष्य कसं पूर्ण करायचं, हे कर्णधार कोहलीने यापूर्वी अनेकवेळा दाखवलं आहे. त्यामुळेच मला इंग्लंविरुद्धची खेळी करण्यासाठी आत्मविश्वास मिळाला. यापूर्वी मी अनेक फलंदाजीच्या संधी गमावल्या होत्या. त्यातच विराटसोबतही फलंदाजी करणं आणि त्याची फलंदाजी जवळून पाहण्याची संधीही चुकली होती. पण या सामन्यानिमित्त ती संधी मिळाली, त्यामुळे हा माझ्यासाठी खास दिवस होता", असं केदार जाधवने नमूद केलं.
दुसरीकडे विराटसोबत धावणं हे मोठं आव्हन असल्याची कबुली केदारने दिली.
संबंधित बातम्या