मुंबई : टीम इंडियाचा 'हिटमॅन' रोहित शर्माने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरवर टिपण्णी केल्यानंतर आमीरनेही त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. रोहितचं माझ्याविषयीचं मत बदललं असेल, असा रिप्लाय आमीरने केला आहे. आमीर हा ओव्हरहाईप्ड आणि सर्वसाधारण गोलंदाज आहे, असं मत रोहितने व्यक्त केलं होतं.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत रोहित शर्माची विकेट घेऊन तुला अतिरिक्त समाधान मिळालं का, असा प्रश्न 'स्काय स्पोर्ट्स'ने आमीरला विचारला होता. यावर उत्तर देताना 'प्रतिस्पर्धी टीमच्या मतांना फरक पडत नाही. मी केवळ बोलिंगकडे लक्ष देतो' असं आमीर म्हणाला.

'ते रोहितचं माझ्याबद्दलचं मत होतं. त्याला मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. कदाचित त्याचं मत आता
बदललंही असेल. पण एक गोष्ट मला आधीच स्पष्ट करु द्या, तो मला 'ओव्हरहाईप्ड आणि सर्वसाधारण गोलंदाज' म्हणाला, म्हणून मी त्याला कधीच सर्वसामान्य फलंदाज म्हणणार नाही. खरं तर मी त्याला असामान्य बॅट्समन मानतो. भारतासाठी त्याने रचलेला विक्रम जबरदस्त आहे आणि मला त्याच्याविषयी आदर आहे.' असं आमीर म्हणाला.

'तो इतर क्रिकेटपटूंविषयी काय मत व्यक्त करतो, हा त्याचा प्रश्न आहे. इतरांविषयी पूर्ण आदर बाळगत मी त्यांच्या मताचा फारसा विचार करत नाही. मी माझ्या कामगिरीकडे आणि आपल्या टीमसाठी काय करता येईल, याकडे लक्ष केंद्रित करतो. मी जर इतरांच्या मताचा विचार करत राहिलो, तर माझ्या मनावर ताण येईल. म्हणूनच मी ते टाळतो' असं आमीर म्हणतो.

रोहित शर्मा काय म्हणाला होता?

फक्त आमीरच नाही, पाक क्रिकेट संघात त्याच्याशिवाय पाच चांगले गोलंदाज आहेत. मात्र त्याच्याविषयी खूप जास्त हाईप निर्माण करण्यात आली आहे. मला समजत नाही, एकाच सामन्यानंतर त्याला डोक्यावर चढवणं, मला पटत नाही. तो चांगला आहे, मात्र त्याला स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे. त्याची तुलना वासिम अक्रमशी केली जाते. तो एक सामान्य गोलंदाज आहे, असं रोहित शर्मा म्हणाला होता.