कोलंबो : जगातील उत्कृष्ट वेगवान गोलंदाजांमध्ये श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाचं नाव आवर्जून घेतलं जातं. वेगवान यॉर्करच्या जोरावर त्यानं आतापर्यंत भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडवणारा मलिंगा आता चक्क फिरकीपटू गोलंदाज झाला आहे.

त्याचं झालं असं की, श्रीलंकेत एका स्थानिक टी-20 मालिकेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मलिंगानं चक्क स्पिन गोलंदाजी केली. एवढंच नव्हे तर त्यानं आपल्या संघासाठी तीन विकेट देखील घेतल्या.


आपल्या शानदार फिरकी गोलंदाजीच्या जोरावर मलिंगानं एलबी फायनान्स संघाला 125 धावांवरच रोखलं. दरम्यान, या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यानं मलिंगाच्या संघाला डकवर्थ लुईस नियमानुसार विजयासाठी 82 धावांचं आव्हान देण्यात आलं. मलिंगाचा संघ टीजे लंकाने हे आव्हान अगदी सहजपणे पार करत एलबी फायनान्सवर दणदणीत विजय मिळवला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मलिंगानं आतापर्यंत एकूण 30 कसोटी, 204 वनडे आणि 68 टी-20 सामने खेळला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये मलिंगानं 101, वनडेमध्ये 301 आणि टी-20 मध्ये 90 बळी घेतले आहेत.