धरमशाला : विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने धरमशाला वन डेत श्रीलंकेसमोर सपशेल लोटांगण घातलं. श्रीलंकेने टीम इंडियाचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात श्रीलंकेसमोर विजयासाठी अवघं 113 धावांचं लक्ष्य होतं.
या परिस्थितीत महेंद्रसिंग धोनीने एक खिंड लढवून भारतीय संघावर नीचांकाची लाजिरवाणी वेळ येऊ दिली नाही. त्याने 10 चौकार आणि दोन षटकारांसह 65 धावांची खेळी उभारली. एवढंच नाही, तर त्याने त्याच्या कौशल्याने अम्पायरच्या निर्णयावरही मात केली.
फलंदाजी करत असताना जसप्रीत बुमरा पाथिराणाचा चेंडू समजू शकला नाही आणि तो बाद होता होता वाचला. पाथिराणाने बाद असल्याची अपील केली आणि पंचांनी बुमराला बाद दिलं.
बुमराने हा निर्णय स्वीकारला आणि माघारी निघाला होता. तेवढ्यातच धोनीने पंचांकडे डीआरएसची मागणी केली. या चेंडूची पुन्हा पडताळणी केली तेव्हा बुमरा बाद नव्हता. धोनीला भारताची धोनी रिव्ह्यू सिस्टम असं का म्हटलं जातं, ते त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं.