Tokyo Olympics : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार बॅडमिन्टन खेळाडू पीव्ही सिंधूचं उत्तम प्रदर्शन पाहायला मिळत आहे. पीव्ही सिंधूनं आणखी एक विजय मिळवला आहे. सिंधूनं प्री-क्वॉर्टर फायनल्समध्ये धडक दिली आहे. सिंधूनं हाँगकाँगच्या खेळाडूला सरळ सेटमध्ये 21-9, 21-16 नं पराभूत केलं. सिंधूनं पदकाच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढं टाकलं आहे. 


पी. व्ही. सिंधूनं टोकियो ऑलिम्पिकची सुरुवातच विजयानं केली होती. त्यानंतर तिचा दुसरा सामना हाँगकाँगच्या च्युंग एनगान सोबत होता. या सामन्यात सिंधूनं तिचा सहज पराभव केला. सिंधूनं दोन सेटमध्येच च्युंग एनगानचा पराभव केला. सिंधूचा हा टोकियो ऑलिम्पिकमधील दुसरा विजय आहे. या विजयासह सिंधूनं नॉकआउट स्टेजमध्ये प्रवेश केला आहे. 


सिंधू सामन्याच्या सुरुवातीपासूनच हाँगकाँगच्या च्युंग एनगानवर दबाव बनवून खेळत होती. सिंधू या सामन्यात काहीशी आक्रमक खेळी करताना दिसून आली. पहिल्या सेटमध्ये सिंधूनं हाँगकाँगच्या च्युंग एनगानचा 21-9 अशा फरकानं परभाव केला. खरंतर सिंधूनं पहिल्या सेटमध्येच सामना आपल्या खिशात घातला होता. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही पीव्ही सिंधूनं 21-16 अशा फरकानं हाँगकाँगच्या च्युंग एनगानचा पराभव केला. अशातच 21-9, 21-16 अशा सरळ सेटमध्ये सिंधूनं हाँगकाँगच्या च्युंग एनगानला पराभूत केलं. या विजयासोबतच सिंधूनं आपलं आणखी एक पाऊल पदकाच्या दिशेनं पुढं टाकलं आहे. देशाला सिंधूकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. 


सलग तिसऱ्यांदा भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव, ग्रेट ब्रिटनकडून 4-1 नं मात


टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाचं ( Indian women's hockey team )प्रदर्शन अत्यंत निराशाजनक राहिलं आहे. आज सलग तिसऱ्यांदा भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव झाला आहे. आजच्या सामन्यात ग्रेट ब्रिटननं भारतीय महिला संघाला 4-1 अशी मात दिली. याआधीच्या सामन्यात जर्मनीनं भारतीय महिला संघाचा 2-0 असा पराभव केला होता.


भारतीय महिला हॉकी टीम आपले सलग तीन सामने गमावल्यामुळं ऑलिम्पिकमध्ये आता काही अपेक्षा उरलेल्या नाहीत. पहिला सामना नेदरलॅंडविरुद्ध 5-1 नं गमावला होता. तर दुसऱ्या सामन्यात जर्मनी विरुद्ध 2-0 नं भारतीय महिला हॉकी टीमचा पराभव झाला होता. भारतीय महिला संघाला तीन सामन्यात आतापर्यंत केवळ दोनच गोल करता आले आहेत.


भारतीय पुरुष हॉकी संघाचा स्पेनवर मात करत दणदणीत विजय



काल भारतीय पुरुष हॉकी संघानं ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या पराभवाचा वचपा काढत स्पेनचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला होता. भारतानं स्पेनला 3-0 अशा फरकानं नमवलं. भारतानं पहिले दोन गोल पहिल्या क्वॉर्टरमध्ये डागले, तर तिसरा गोल शेवटच्या क्वॉर्टरमध्ये डागला. स्पेनचा संघ आठ पेनल्टी कॉर्नर मिळाल्यानंतरही गोल करण्यात अयशस्वी ठरला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


IND vs SL T20 Postponed : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका दुसरा टी20 सामना पुढे ढकलला, क्रुणाल पंड्या कोरोना पॉझिटिव्ह