पॅरिस : सध्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचा थरार रंगला आहे. या वर्षाच्या ऑलिम्पिकमध्ये भालाफेकपटू नीरज चोप्राला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. त्याला रौप्य पदक मिळालं तर पाकिस्तानच्या अर्शद नदीम याने सुवर्णपदक पटकावले. दरम्यान, नीरजच्या या कामगिरीनंतर त्याच्या आई सरोज देवी यांनी अगदी आगळीवेगळी प्रतिक्रिया दिली आहे.
नीरज चोप्राला रौप्य तर पाकिस्तानच्या नदीमला सुवर्णपद
भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा नीरज चोप्रा तर पाकिस्तानचा अर्शद नदीम यांच्यात मुख्य लढत होती. नदीमनं दुसऱ्या प्रयत्नात 92.29 मीटरपर्यंत भालाफेक केली. त्याने फेकलेला हा भाला ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वाधिक लांब भालाफेक ठरला. नीरज चोप्राचा दुसरा थ्रो 89.45 मीटरपर्यंत गेला. त्यामुळे या भालाफेक स्पर्धेत नदीमला सुवर्णपदक तर नीरज चोप्राला रौप्य पदक मिळालं.
नीरजच्या आईची खास प्रतिक्रिया
मुलाने रौप्य पदक मिळवल्यानंतर नीरज चोप्रा यांच्या आईने दिलेल्या प्रतिक्रियेची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. नीरजने रौप्य पदक मिळवलं. त्याला मिळालेलं रोप्य पदक आम्हाला सुवर्णपदकाप्रमाणे भासत आहे. तो घरी आल्यानंतर मी त्याच्या आवडीचं जेवण तयार करणार आहे.ज्या खेळाडूला सुवर्णपदक मिळालं आहे, तोदेखील माझा मुलगाच आहे, अशी प्रतिक्रिया नीरजच्या आई सरोज देवी यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं कौतुक
नीरजच्या या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. नीरज चोप्राने आपली चमक दाखवली आहे. नीरजच्या रुपात ऑलिम्पिकमधील आणखी एका यशामुळे भारताला आनंद झाला आहे. रौप्यपदक मिळवल्यामुळे नीरज चोप्रोचे खूप खूप अभिनंदन. नीरज आगामी पिढ्यातील अनेक खेळाडूंना त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रेरित करीत राहील, अशा भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, याआधीच्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं होतं. त्याच्या या निर्भेळ यशानंतर तेव्हादेखील संपूर्ण भारतात जल्लोष करण्यात आला होता.
हेही वाचा :
नीरजचं रौप्य जिंकलं; पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं पदकांचा दुष्काळ संपवला, सुवर्ण जिंकत रचला इतिहास
Neeraj Chopra : भारताल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिलं रौप्यपदक, नीरज चोप्राला सुवर्णपदकाची हुलकावणी