मुंबई : भारतीय क्रिकेट संघाला दोन विश्वचषक जिंकून देणारा स्टार क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी सध्या आऊट ऑफ फॉर्म आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून त्याच्यावर टीका केली जात आहे. अनेक माजी क्रिकेटर आणि क्रीडा समीक्षकांनी धोनीला निवृत्तीचा सल्लादेखील दिला आहे. परंतु पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने धोनीची पाठराखण केली आहे. आफ्रिदी म्हणाला की, "धोनीला निवृत्तीचा सल्ला देण्याचा अधिकार कोणालाही नाही." एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आफ्रिदी बोलत होता.
आफ्रिदीने धोनीची पाठराखण करताना म्हटले की, “धोनीचे भारतीय संघासाठीचे योगदान खूप मोठे आहे. त्याच्याइतके योगदान देणारे खूप कमी खेळाडू असतील. त्यामुळे कोणालाही धोनीला निवृत्त हो, असे सांगण्याचा अधिकार नाही. 2019 साली होणाऱ्या विश्वचषकासाठी धोनीला भारतीय संघात जागा मिळायला हवी.”
मागील काही मालिकांमध्ये धोनी सातत्याने अपयशी ठरत आहे. धोनीची बॅट योग्य वेळी न तळपल्यामुळे भारताने काही सामने गमावले आहेत. त्यामुळे धोनीवर सर्व स्तरातून टीका होत आहे. माजी क्रिकेटर, समीक्षक आणि नेटीझन्सदेखील धोनीला वेगवेगळ्या माध्यमातून टार्गेट करत आहेत.
वाचा - काश्मीर सांभाळण्याची पाकची कुवत नाही : शाहिद आफ्रिदी