नवी दिल्ली : टीम इंडियाचा वन डे आणि टी-20 कर्णधार महेंद्र सिंह धोनी अडीच महिन्यानंतर पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी धोनी कसलाही सराव करणार नसल्याचं बोललं जात आहे.
भारताचा इंग्लंडविरुद्धचा पहिला वन डे 15 जानेवारीला पुण्यात खेळवला जाणार आहे. 29 ऑक्टोबरला विशाखापट्टणममध्ये झालेल्या शेवटच्या वन डेनंतर धोनीचा हा पहिलाच सामना असेल.
दुखापतग्रस्त खेळाडूंना कमबॅकसाठी स्वतःच्या नावाचा विचार करण्यासाठी एक प्रथम श्रेणी सामना खेळणं गरजेचं आहे. मात्र धोनीसाठी हा नियम लागू होत नाही. कारण त्याने दीर्घकालीन स्वरुपाच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे.
धोनीने 2015 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी तयारीसाठी झारखंडकडून विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभाग घेतला होता.
मात्र विजय हजारे ट्रॉफी यावेळी इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना झाल्यानंतर जवळपास 4 चार आठवड्यानंतर म्हणजेच 25 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. काही वन डे खेळाडूंनी तयारीसाठी आपापल्या राज्यांकडून रणजीमध्ये खेळण्यास सुरुवात केली आहे. मात्र धोनीने अजून हा पर्याय निवडलेला नाही, अशी माहिती आहे.
धोनी झारखंडकडून खेळण्याची आतापर्यंत कसलीही माहिती नाही. कारण धोनीने दीर्घकालीन स्वरुपाच्या खेळातून धोनीने अगोदरच निवृत्ती घेतली आहे. मात्र धोनी झारखंड टीमसोबत सध्या तयारी करत असल्याची माहिती आहे, असं निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितलं.