मुंबई : आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करुन पदक जिंकणं, हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. पण याला महाराष्ट्राचा एक खेळाडू अपवाद ठरला आहे, त्याने महाराष्ट्राशीच नाही तर भारताशीही गद्दारी केल्याचा आरोप होत आहे. हा खेळाडू आहे कोल्हापूरचा रांगडा बॉडी बिल्डर सुहास खामकर.
सुहास खामकरने हाँगकाँगमध्ये झालेल्या अमॅच्युअर ऑलिम्पिया स्पर्धेत चक्क थायलंडकडून प्रतिनिधित्व केलं. विशेष म्हणजे ही बाब स्पर्धेच्या निकालानंतर स्पष्ट झाली. या स्पर्धेत सुहासला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. निकालात सुहास खामकरच्या नावासमोर थायलंड या देशाचं नाव आलं आणि एकच खळबळ उडाली.
आपण थायलंडच्या जिममधून या स्पर्धेत सहभागी झाल्याचं सुहास मान्य करतो, पण थायलंडमध्ये आपण भारताचं प्रतिनिधित्व करत असल्याचा दावा त्याने केला. पण त्यामुळे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
1. ज्या स्पर्धेला भारताचा संघच गेला नाही, त्या स्पर्धेत थायलंडच्या जिमकडून सुहास भारताचं प्रतिनिधित्व कसं काय करु शकतो?
2. सुहासला हॉंगकॉंगच्या स्पर्धेत सहभागीच व्हायचं होतं, तर मुंबईत झालेल्या स्पर्धेत सहभागी का झाला नाही?
3. भारतीय संघ हॉंगकॉंगच्या स्पर्धेत गेला नसताना, सुहासचा या स्पर्धेसाठी हट्ट का होता?
सुहासनं केलेल्या या कृत्याचा बॉडी बिल्डिंग संघटनेकडून निषेध व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात सुहास खामकरवर कायदेशीर कारवाईची तयारी सुद्धा केली जात आहे. सुहास हा शासनाचा कर्मचारी आहे. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्याला शासन सेवेपासून दूर ठेवण्यात यावं, अशी मागणी बॉडीबिल्डिंग संघटनेकडून करण्यात येत आहे.
सुहास खामकरनं 9 वेळा 'भारत श्री'चा किताब पटकावला. पण 2015 नंतरची त्याची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. बॉडी बिल्डिंगच्या जोरावर सुहासला शासनाने सेवेत घेतलं, पण एका लाच प्रकरणात सुहासला अटक देखील झाली होती.
क्रीडा खात्याने यामध्ये मध्यस्थी करुन नेमकी घटना काय आहे, यावर निर्णय घ्यावा, नाही तर सुहास सारखे अनेक खेळाडू याच मार्गाचा अवलंब करतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.