विश्वविजेता निको रोसबर्गची फॉर्म्युला वनमधून निवृत्ती
एबीपी माझा वेब टीम | 02 Dec 2016 09:24 PM (IST)
फॉर्म्युला वनचा नवा विश्वविजेता निको रोसबर्गनं निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. रोसबर्गनं विश्वविजेतेपद मिळवल्यानंतर केवळ पाचच दिवसांत निवृत्ती स्वीकारल्यानं एफवनच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. माझं विश्वविजेतेपदाचं स्वप्न साकार झालं आहे. त्यामुळं यापुढं मला आणखी खेळण्याची इच्छा नाही. या शब्दांत रोसबर्गनं आपली भावना व्यक्त केली. 31 वर्षांचा निको रोसबर्ग हा फॉर्म्युला वनचे माजी विश्वविजेता केके रोसबर्ग यांचा पुत्र आहे. तो आजवर 206 ग्रां-प्री शर्यतींमध्ये सहभागी झाला असून, त्यापैकी 23 शर्यती त्यानं जिंकल्या आहेत. यंदाच्या एफ वन मोसमात रोसबर्गनं 21पैकी 9 शर्यती जिंकल्या आहेत. 27 नोव्हेंबरला अबुधाबी ग्रां-प्रीत दुसरं स्थान मिळवून रोसबर्गनं कारकीर्दीत पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावलं होतं.