न्यूझीलंडच्या इस्टर्न डिस्ट्रिक्ट पोलिसांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, "न्यूझीलंड दौऱ्यावर आलेल्या एका टीमपासून सावध राहा, त्यांच्यापासून जपून राहण्याचे आवाहन आम्ही तुम्हाला करु इच्छितो. आम्हाला त्यांची काही माहिती मिळाली आहे. त्या माहितीनुसार या गटाने न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाची मोठी मानहानी केली आहे. त्यामुळे क्रिकेट बॅट व बॉल घेऊन फिरणाऱ्या या टोळीपासून नागरिकांनी सावध राहायला हवे,'
न्यूझींलडविरुद्धच्या नेपियर येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने यजमानांवर 8 विकेट राखून विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 90 धावांनी धुवा उडवला होता. आज माऊंट मॉन्गॅनुई येथे सुरु असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडच्या संघाला 49 षटकात 243 धावांवर ऑल आऊट केले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना भारतीय संघाने 21 षटकांत एका गड्याच्या बदल्यात 103 धावा केल्या आहेत. हा सामना भारत जिंकेल असे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे.