Neeraj Chopra Diamond League 2024 Final : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा डायमंड लीग फायनलमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर राहिला. त्यात पण कोट्यवधी भारतीय चाहत्यांसाठी मोठा धक्का म्हणजे नीरज चोप्रा फक्त एक सेंटीमीटरने सुवर्णपदक जिंकण्यापासून मुकला. 


पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या नीरजने डायमंड लीग 2024 च्या अंतिम फेरीत 87.86 मीटरचा सर्वोत्तम थ्रो केला आणि रौप्य पदक जिंकण्यात यश मिळविले. ग्रेनेडाच्या पीटर्स अँडरसनने 87.87 मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले. खरंतर, भारतासाठी ही अभिमानाची बाब आहे. कारण दुखापतग्रस्त असतानाही नीरज चोप्राने डायमंड लीग 2024 च्या अंतिम फेरीत लढला आणि सुवर्णपदक जिंकण्यापासून फक्त 1 सेंटीमीटरने चुकला. 


डायमंड लीग 2024 मध्ये नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानावर


डायमंड लीग 2024 च्या अंतिम फेरीत नीरज चोप्रा आणि पीटर्स अँडरसन यांच्यात चुरशीची लढत पाहिला मिळाली. प्रत्येक थ्रोनंतर स्पर्धा अधिक रोमांचक होत गेली. भारताच्या नीरजने पहिल्याच प्रयत्नात 86.82 मीटर फेकला.  


त्यानंतर नीरज चोप्राचा दुसरा प्रयत्न काही खास नव्हता आणि त्याने 83.49 मीटरचा थ्रो केला. तिसऱ्या प्रयत्नात त्याचा सर्वोत्तम थ्रो आला आणि तो 87.86 मीटरचा होता आणि अँडरसनच्या अगदी जवळ पण 1 सेंटीमीटरपासून लांब राहिला. त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.


डायमंड लीग 2024 अंतिम स्कोअर



  • पीटर्स अँडरसन - 87.87 मीटर

  • नीरज चोप्रा - 87.86 मीटर

  • वेबर ज्युलियन - 85.97 मीटर

  • मार्डे एंड्रियन - 82.79 मीटर

  • डीन रॉडरिक गेन्की - 79.78 मीटर


पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकले रौप्यपदक 


गेल्या महिन्यात पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नीरज चोप्राने 89.45 मीटर फेक करून रौप्य पदक जिंकले होते. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटर विक्रमी थ्रो करून सुवर्णपदक जिंकले. त्यावेळी अँडरसनला तिसऱ्या स्थानावर होता.


नीरज चोप्रा 2022 डायमंड लीग चॅम्पियन 


नीरज चोप्रा कदाचित 2024 मध्ये डायमंड लीग चॅम्पियन बनला नाही, परंतु दोन वर्षांपूर्वी हे विजेतेपद जिंकण्यात तो यशस्वी ठरला होता. त्या वर्षी नीरजने अंतिम फेरीत 88.44 मीटर भालाफेक करून डायमंड लीग चॅम्पियन बनण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला होता. 2023 मध्ये नीरज 83.80 मीटर भाला फेकून दुसऱ्या क्रमांकावर राहिला.


नीरज चोप्रावर पैशांचा पाऊस


डायमंड लीगचा चॅम्पियन बनणाऱ्या खेळाडूला 30 हजार अमेरिकन डॉलर्स मिळतात. म्हणजेच ग्रेनेडाच्या अँडरसनला सुमारे 25 लाख रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल. तर दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या नीरज चोप्राला 12 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 10 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले.