बडोदा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी विकेट कीपर नयन मोंगियाच्या मुलाची अंडर-19 क्रिकेटमध्ये सध्या जोरदार चर्चा आहे. कूच बिहार ट्रॉफीमध्ये बडोद्याचं नेतृत्त्व करणाऱ्या मोहित मोंगियाने सुमारे 29 वर्षांनंतर आपल्याच वडिलांचा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडला आहे.

मोहितने मुंबईविरोधात 246 चेंडूत नाबाद 240 धावांची खेळी केली. कूच बिहार ट्रॉफीमध्ये बडोद्याच्या एखाद्या फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी नयन मोंगियाने 1988 मध्ये केरळविरुद्ध 224 धावा केल्या होत्या.

मुलानेच विक्रम मोडल्यानतंर नयन मोंगिया म्हणाला की, "मी अतिशय आनंदी आहे. माझ्या मुलाने हा विक्रम मोडला. माझा विश्वासच बसत नाही. मोहित जबरदस्त खेळला. तो या विक्रमासाठी लायक आहे."

"मोहितने मला कॉल केला होता. या खेळीवर तो फारच खुश आहे. पण त्याने फक्त एक द्विशतकावर समाधान मानू नये," असं नयन मोंगियाने सांगितलं.

दरम्यान, नयन मोंगियाने 44 कसोटी आणि 140 वन डे सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.