मुंबई : आंतरराष्ट्रीय पैलवान नरसिंग यादव आगामी सीनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 74 किलो वजनी गटात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करेल. या स्पर्धेचं 23 आणि 24 जानेवारी या कालावधीत नोएडात आयोजन करण्यात आलं आहे.


त्यासाठी पुण्याच्या कात्रजमधल्या मामासाहेब मोहोळ केंद्रात सीनियर गटाच्या राज्य निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेतून महाराष्ट्राचा दहा सदस्यीय संघ निवडण्यात आला.



नरसिंग यादव महाराष्ट्र पोलिसांत उपअधीक्षक पदावर कार्यरत असून, त्यानं आंतरराष्ट्रीय कुस्तीवर आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. त्यानं 2015 साली लास वेगासमधल्या जागतिक विजेतेपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती. त्याआधी 2014 सालच्या इन्चिऑन एशियाडमध्येही तो कांस्यपदकाचा मानकरी ठरला होता. 2015 साली कतारमधल्या दोहा येथे झालेल्या आशियाई कुस्तीत नरसिंग यादवनं कांस्यपदक पटकावलं होतं. 2010 साली नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यानं सुवर्णपदकाचा मान पटकावला होता.


नरसिंग यादवचा हाच लौकिक लक्षात घेऊन सीनियर गटाच्या राज्य निवड चाचणीत त्याच्यासमोर एकाही पैलवानानं आव्हान उभं करण्याचं टाळलं. त्यामुळं एकही कुस्ती न खेळता नरसिंग यादव महाराष्ट्राच्या संघात दाखल झाला.



महाराष्ट्राचा संघ : विजय पाटील (57 किलो), सूरज कोकाटे (61 किलो), अक्षय हिरुगडे (65 किलो), कालिचरण सोलनकर (70 किलो), नरसिंग यादव (74 किलो), समीर शेख (79 किलो), वेताळ शेळके (86 किलो), पृथ्वीराज पाटील (92 किलो), सिकंदर शेख (97 किलो), शुभम सिदनाळे (97 किलोवरील)