नवी दिल्ली : महाराष्ट्राचा पैलवान नरसिंग यादवला रिओ ऑलिम्पिकला जाण्याची संधी मिळणार की नाही? या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. नरसिंगविषयी निर्णय शनिवारी किंवा सोमवारी घेतला जाईल, असं नाडाच्या वकिलांनी
स्पष्ट केलं आहे.


 
नाडाच्या मुख्यालयात आज पुन्हा एकदा नरसिंगची सुनावणी झाली. बुधवारी नाडा मुख्यालयाबाहेर नरसिंगच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज नाडाच्या मुख्यालयाबाहेर सुरक्षाव्यवस्था आणखी कडक करण्यात आली होती.

 

25 जून आणि 5 जुलैला नरसिंगच्या अ आणि ब नमुन्यांची तपासणी झाली होती. त्यात मेटँडिएनोन या उत्तेजकाचा अंश आढळून आला होता. नरसिंगनं मात्र आपल्यावरचे डोपिंगचे आरोप फेटळाले असून, आपल्या खाण्यात काहीतरी मिसळण्यात आल्याची तक्रार केली होती. पण नरसिंगनं केलेल्या षडयंत्राच्या आरोपांना पुरावा म्हणून सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध नाही.

 
दरम्यान, नरसिंगनं याप्रकरणी बुधवारी सोनीपत पोलिसांत एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर हरयाणा पोलिसांनी आज सोनीपतच्या साई सेंटरमध्ये जाऊन चौकशीही केली.