मुंबई : आयपीएलच्या रणांगणात आजचं मुख्य आकर्षण असलेला मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघांमधला सामना रात्री आठ वाजता खेळवण्यात येईल. यंदाच्या मोसमात प्ले ऑफचं तिकीट मिळवायचं तर मुंबई आणि राजस्थान या दोन्ही संघांना पराभव परवडणारा नाही.


त्यामुळे वानखेडे स्टेडियमवरच्या या सामन्यात रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेच्या संघांसाठी 'करो या मरो'ची स्थिती आहे.

आयपीएलच्या गुणतालिकेत मुंबई आणि राजस्थानने पाच विजयांसह दहा गुणांचीच कमाई केली आहे. पण मुंबईने कोलकात्यावर 102 धावांनी मिळवलेल्या विजयाने रोहितसेनेचा नेट रनरेट अतिशय उत्तम आहे.

मुंबईच्या फलंदाजांना आणि गोलंदाजांना गवसलेला सूर लक्षात घेता, राजस्थानविरुद्धच्या सामन्यात मुंबईचं पारड जड ठरणार आहे. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सचा यष्टिरक्षक फलंदाज जॉस बटलरही शानदार फॉर्मात आहे.