बंगळुरु: कायरन पोलार्ड आणि कृणाल पंड्यानं सहाव्या विकेटसाठी रचलेल्या 93 धावांच्या भागिदारीनं मुंबई इंडियन्सला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर सात चेंडू आणि चार विकेट्स राखून सनसनाटी विजय मिळवून दिला.
या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी बंगलोरला 20 षटकांत पाच बाद 142 असं रोखलं होतं. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा जोस बटलर स्वस्तात माघारी परतला. पुढच्याच षटकात लेग स्पिनर सॅम्युअल बद्रीनं पार्थिव पटेल, मॅकलेनहान आणि रोहित शर्मा यांना लागोपाठच्या चेंडूंवर माघारी धाडून हॅटट्रिक साजरी केली. मग नितीश राणाही परतला आणि मुंबईची आठ षटकांत पाच बाद 34 अशी बिकट अवस्था झाली.
त्या परिस्थितीत पोलार्ड आणि कृणाल पंड्यानं सहाव्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी रचून मुंबईला विजयपथावर नेलं. पोलार्डनं 47 चेंडूंत तीन चौकार आणि पाच षटकारांसह 70 धावांची निर्णायक खेळी केली. कृणाल पंड्यानं 30 चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकारासह नाबाद 37 धावांची खेळी केली. त्यानं हार्दिक पंड्याच्या साथीनं मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
बद्रीची हॅटट्रिक, पण विजय पदरी नाहीच!
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा वेस्ट इंडियन लेग स्पिनर सॅम्युअल बद्रीनं मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिक साजरी केली. बद्रीनं डावातल्या तिसऱ्याच षटकात बद्रीनं पार्थिव पटेल, मिचेल मॅकलेनहान आणि रोहित शर्मा यांना लागोपाठ तीन चेंडूंवर माघारी धाडलं आणि मुंबई इंडियन्सची चांगलीच पंचाईत केली.
बद्री हा आयपीएलमध्ये हॅटट्रिक साजरी करणारा आजवरचा बारावा गोलंदाज ठरला आहे. बद्रीच्या गोलंदाजीचं पृथःकरण होतं चार षटकं, एक निर्धाव नऊ धावा आणि चार विकेट्स. पण बद्रीच्या या भन्नाट स्पेलला विजयाचं सुख मात्र लाभू शकलं नाही.