मुंबई : चेन्नई सुपरकिंग्जने सनरायझर्स हैदराबादचा दोन विकेट्सनी पराभव करून आयपीएलच्या क्लालिफायर वनचा सामना जिंकला. या विजयाने चेन्नईला आयपीएलच्या फायनलचं तिकीट मिळवून दिलं.


चेन्नईच्या या विजयात फॅफ ड्यू प्लेसीसची नाबाद 67 धावांची खेळी निर्णायक ठरली. ड्यू प्लेसीसने 42 चेंडूंमधली ही खेळी पाच चौकार आणि चार षटकारांनी सजवली. शेन वॉटसनच्या साथीने ड्यू प्लेसी सलामीला मैदानात उतरला होता.

दुसऱ्या बाजूने चेन्नईची आठ बाद 113 अशी घसरगुंडी उडाली. पण ड्यू प्लेसीसने एक खिंड लढवून चेन्नईला सनसनाटी विजय मिळवून दिला. त्याला खऱ्या अर्थाने साथ दिली, ती शार्दूल ठाकूरने. नशिबानेही शार्दूलला साथ दिली आणि चेन्नईच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. शार्दूलने पाच चेंडूंमध्ये नाबाद 15 धावा केल्या, ज्यामध्ये तीन चौकारांचा समावेश होता.

''धोनीने सांगितलं होतं, चेंडू पाहा आणि मग मार''

शार्दूल ठाकूरने या खेळीचं श्रेय कर्णधार महेंद्रसिंह धोनीला दिलं. ''ही एक चांगली संधी होती आणि संघासाठी धावा करण्याची गरज होती. जेणेकरुन फाफ डू प्लेसिसला साथ मिळेल. कारण, तो सेट झालेला होता. प्रशिक्षकांनीही सांगितलं होतं, की तू फलंदाजी करु शकतोस. पुण्याकडून खेळताना फलंदाजीची संधी आलेली असल्यामुळे अनुभव होताच. मैदानात उतरतानाच धोनीने सांगितलं, की चेंडू पाहा आणि मग मार. त्याप्रमाणेच केलं, शिवाय प्लेसिससोबतही चर्चा झाली होती. त्याने मला एक धाव काढून स्ट्राईक द्यायला सांगितली होती. मात्र त्यापेक्षाही चांगलं घडलं,'' असं शार्दूलने सामन्यानंतर बोलताना सांगितलं.

एकोणिसाव्या षटकात काय घडलं?

शार्दूल ठाकूर 19 व्या षटकात फलंदाजीसाठी आला तेव्हा समोर सिद्धार्थ कौल गोलंदाजीसाठी होता. एक धाव काढून प्लेसिसला स्ट्राईक देण्याच्या विचारात शार्दूल होता, मात्र पहिल्याच चेंडूवर चौकार गेला. दुसऱ्या चेंडूवरही शार्दूल थोडक्यात बचावला आणि यष्टिरक्षकाच्या मागे तो चेंडू चौकार गेला.

तिसऱ्या चेंडूवर शार्दूलने एक धाव काढून प्लेसिसला स्ट्राईक दिली. चौथा चेंडू सिद्धार्थ कौलने वाईड टाकला. त्यानंतरच्या चेंडूवर प्लेसिसने पुन्हा एक धाव काढली आणि शार्दूल स्ट्राईकवर आला. पाचव्या चेंडूवर दोन धावा काढून शार्दूलच स्ट्राईकवर राहिला. मात्र अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकला आणि एकाच षटकात दोघांनी मिळून 15 धावा जमवल्या.

या षटकात 15 धावा कुटल्यामुळे चेन्नईला विजयासाठी अखेरच्या सहा चेंडूमध्ये केवळ सहाच धावांची गरज होती आणि गोलंदाजीसाठी समोर भुवनेश्वर कुमार उभा होता. मात्र स्ट्राईकवर असलेल्या प्लेसिसने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत चेन्नईचं फायनलचं तिकीट बूक केलं.

संबंधित बातमी :

ब्राव्होचा धोनीसमोर बेभान डान्स, हरभजनचीही साथ