Mohammed Shami : टीम इंडियाचा स्टार बॉलर मोहम्मद शमी त्याच्या गोलंदाजीने धडकी भरवत आहे. क्रिकेट व्यतिरिक्त तो वैयक्तिक आयुष्यात खूप भावनिक आणि नम्र व्यक्ती आहे. क्रिकेट विश्वचषक संपल्यानंतर शमी रिलॅक्स मोडमध्ये आहे. सध्या तो नैनितालमध्ये सुट्टी घालवत आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो अपघातग्रस्त कारमध्ये अडकलेल्या व्यक्तीला मदत करताना दिसत आहे. मोहम्मद शमीने व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'तो खूप भाग्यवान आहे, देवाने त्याला दुसरं आयुष्य दिले आहे. नैनितालमध्ये त्यांची कार डोंगराळ रस्त्यावरून खाली पडली. ते माझ्या गाडीच्या समोरून चालत होते. आम्ही त्यांना गाडीतून सुखरूप बाहेर काढले. व्हिडिओमध्ये भारतीय वेगवान गोलंदाज आणि त्याचे सहकारी अपघातग्रस्त कारजवळ उभे असल्याचे दिसत आहे.



मोहम्मद शमी हे भारताच्या एकदिवसीय विश्वचषक मोहिमेमध्ये प्रभावित करणाऱ्या खेळाडूंमध्ये एक प्रमुख नाव होते. दुर्दैवाने टीम इंडियाला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हृदयद्रावक पराभवाला सामोरे जावे लागले. अनुभवी वेगवान गोलंदाज शमीने विश्वचषकातील 7 सामन्यात 10.71 च्या सरासरीने 24 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्धच्या लीग टप्प्यातील पहिल्या 4 सामन्यांमध्ये तो भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता.






अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या दुखापतीनंतर या 33 वर्षीय वेगवान गोलंदाजाला खेळण्याची संधी मिळाली. त्याने 7 सामन्यात 3 वेळा 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या. यामध्ये उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध 7 विकेट्सचाही समावेश आहे, जी विश्वचषकातील भारतीय खेळाडूची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. तो एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज देखील आहे.



भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळण्यात व्यस्त आहे. या टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे आहे. या मालिकेसाठी शमीसह वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत भारत सध्या १-० ने आघाडीवर आहे.


इतर महत्वाच्या बातम्या