मेलबर्न : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी केलेल्या बॉल टेम्परिंगमुळे संपूर्ण क्रीडा विश्वातून त्यांच्यावर टीका होत आहे. त्यामुळे स्टीव्ह स्मिथ याला कर्णधारपदावरुन देखील पायउतार व्हावं लागलं आहे. अशावेळी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क पुन्हा ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


36 वर्षीय मायकल क्लार्कने 2015 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. सध्या तो ऑस्ट्रेलियाच्या नाइन नेटवर्कसाठी समालोचकाची भूमिका पार पाडतो आहे.



पण या संपूर्ण प्रकरणाविषयी जेव्हा त्याला असं विचारण्यात आलं की, 'तू पुन्हा कर्णधार होऊ इच्छितो का?', याबाबत बोलताना क्लार्क म्हणाला की, 'जर मला याविषयी योग्य लोकांनी विचारलं तर मी त्याविषयी नक्की विचार करेन.'

दरम्यान, या प्रकरणाविषयी बोलताना क्लार्क म्हणाला की, 'मला मनापासून असं वाटतं की, स्मिथने खरंच खूप मोठी चूक केली आहे.'

काय आहे प्रकरण?

ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला केपटाऊन कसोटीत चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेराने रंगेहाथ पकडलं. या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बॅनक्रॉफ्टने खिशातून सँडपेपर काढून, आधी चेंडू त्या सँडपेपरने घासला आणि मग तो सँडपेपरचा तुकडा पुन्हा आपल्या पँटच्या आत दडवला. हे पूर्ण दृश्य टेलिव्हिजन कॅमेराने टिपल्याने बॅनक्रॉफ्टला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं.


चेंडूशी छेडछाड केल्याची स्मिथकडून कबुली

चेंडूशी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर स्टीव्ह स्मिथने माफी मागितली. ''चेंडूशी छेडछाड केल्यामुळे आम्हाला फायदा होईल, असं वाटलं होतं. संघ व्यवस्थापनाला याची माहिती होती. मात्र प्रशिक्षकांचा यामध्ये सहभाग नाही. ही अभिमानाची गोष्ट नाही. माझ्या नेतृत्त्वात पुन्हा अशी चूक होणार नाही,'' असं स्टीव्ह स्मिथ म्हणाला होता.

स्मिथला कर्णधारपदावरुन हटवा : ऑस्ट्रेलिया सरकार

ही घटना धक्कादायक आणि निराशाजनक असल्याचं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल यांनी म्हटलं होतं. ‘दक्षिण आफ्रिकेतील बातम्या सकाळी-सकाळी पाहून दुःख झालं. ऑस्ट्रेलिया संघाच्या या प्रकारामुळे विश्वासाला तडा गेला.’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

संपूर्ण देशाला शरमेने मान खाली लावायला लावणारी ही घटना आहे. त्यामुळे लवकरच क्रिकेट ऑस्ट्रेलिया यावर कारवाई करेन, अशी अपेक्षा करत असल्याचं टर्नबुल म्हणाले. त्यानुसार क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कर्णधार आणि उपकर्णधारावर कारवाई केली.

संबंधित बातम्या :

स्टीव्ह आणि कॅमेरुनवर अखेर आयसीसीकडूनही कारवाई

स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने हटवा, ऑस्ट्रेलिया सरकारचे आदेश

चेंडूशी छेडछाड, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेऱ्यात कैद

स्मिथ, वॉर्नर कर्णधार आणि उपकर्णधारपदावरुन पायउतार