Michael Clarke: ऑस्ट्रेलियाच माजी कर्णधार आणि जगातील आघाडीचा फलंदाज मायकल क्लार्क यांना त्वचेच्या कर्करोगाचे निदान झाले आहे. क्लार्कने इंस्टाग्रामवर लिहिले, “त्वचेचा कर्करोग खरा आहे, विशेषतः ऑस्ट्रेलियात. आज पुन्हा माझ्या नाकातून एक गाठ काढली गेली. त्वचेची तपासणी करा, ही एक मैत्रीपूर्ण आठवण आहे. प्रतिबंध हा उपचारापेक्षा चांगला, पण माझ्यासाठी नियमित तपासण्या आणि लवकर ओळख महत्त्वाची आहे. डॉ. बिश सोलीमन यांनी हे लवकर पकडले, यासाठी मी खूप आभारी आहे.”
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क हा असा क्रिकेटपटू आहे ज्याने आपल्या खेळाच्या बळावर संपूर्ण एका युगाची व्याख्या केली. सुंदर स्ट्रोक प्ले आणि तीक्ष्ण क्रिकेटिंग बुद्धिमत्तेसाठी ओळखल्या जाणाऱ्या क्लार्कने 2004 ते 2015 या कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली. क्लार्कने 2004 ते 2015 या काळात ऑस्ट्रेलियासाठी 115 कसोट्या, 245 एकदिवसीय सामने आणि 34 टी-20 सामने खेळले. त्यांनी कसोटी आणि एकदिवसीय संघाचे नेतृत्व केले. त्यांच्या कर्णधारपदाच्या काळात ऑस्ट्रेलियाने 2013-14 मध्ये अॅशेस मालिकेत 5-0 अशी विजयाची नोंद केली तसेच 2015 मध्ये विश्वचषक जिंकला.
क्लार्कची त्वचेच्या कर्करोगाशी लढाई 2006 पासून सुरू आहे, जेव्हा त्यांना पहिल्यांदा निदान झाले होते. 2019 मध्ये, त्यांनी उघड केले की डॉक्टरांनी तीन नॉन-मेलेनोमा जखम काढून टाकल्या आहेत. त्यावेळी, क्लार्कने सूर्यप्रकाशापासून स्वतःचे संरक्षण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
त्वचेचा कर्करोग का होतो?
त्वचेचा कर्करोग प्रामुख्याने सूर्यप्रकाशातील अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणे किंवा टॅनिंग बेड्समधील किरणोत्सर्गामुळे होतो. हा जगातील सर्वाधिक आढळणारा कर्करोग असून, लवकर तपासणी व योग्य उपचार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. ऑस्ट्रेलियात या आजाराचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. उच्च UV पातळी, विषुववृत्ताजवळील भौगोलिक स्थिती आणि गोऱ्या त्वचेची लोकसंख्या ही मुख्य कारणे आहेत. आकडेवारीनुसार, 70 वर्षांपर्यंत किमान तीनपैकी दोन ऑस्ट्रेलियन नागरिकांना त्वचेच्या कर्करोगाचा धोका असतो.