मैदानावर कोसळल्यानंतर केदार जाधवसाठी ड्रेसिंगरुममधून मेसेज आला.
"जर बाहेर आलास, तर दुखापतीचा त्रास आणखी वाढेल.
त्यामुळे जितका थांबू शकशील तितका मैदानातच थांब, खेळत राहा.
20-30 धावांसाठी फलंदाजी कर".
त्यावेळी मी विचार करत होतो, जर एकच धाव घेतली, तर जास्त प्रयत्न करावे लागणार होते. त्यामुळे मोठे फटके खेळले तर धावण्यासाठी वेळ मिळेल. विराट काही वेळापूर्वीच आऊट झाल्याने आम्ही बॅकफूटवर गेलो अशी विरोधकांची धारणा होऊ नये, याचीही काळजी घ्यायची होती. त्यामुळे मी पायात कळ असूनही दोन-तीन फटके मारले, असं केदार जाधवने सांगितलं. कोहलीमुळे मोठी इनिंग खेळू शकलो कर्णधार विराट कोहलीमुळेच मी इतकी चांगली खेळी करु शकलो, असं टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्धच्या विजयाचा शिल्पकार केदार जाधवने सांगितलं. इंग्लंडचं डोंगराएवढं 351 धावांचं लक्ष्य लिलया पेलल्यानंतर, टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार विराट कोहलीने, मराठमोळ्या केदार जाधवचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. त्यानंतर केदार जाधवनेही आपल्या खेळीचं राज उघडून सांगितलं. याशिवाय केदार जाधवने कर्णधार कोहलीचेही आभार मानले. "मोठं लक्ष्य कसं पूर्ण करायचं, हे कर्णधार कोहलीने यापूर्वी अनेकवेळा दाखवलं आहे. त्यामुळेच मला इंग्लंविरुद्धची खेळी करण्यासाठी आत्मविश्वास मिळाला. यापूर्वी मी अनेक फलंदाजीच्या संधी गमावल्या होत्या. त्यातच विराटसोबतही फलंदाजी करणं आणि त्याची फलंदाजी जवळून पाहण्याची संधीही चुकली होती. पण या सामन्यानिमित्त ती संधी मिळाली, त्यामुळे हा माझ्यासाठी खास दिवस होता", असं केदार जाधवने नमूद केलं. दुसरीकडे विराटसोबत धावणं हे मोठं आव्हन असल्याची कबुली केदारने दिली. देशासाठी खेळल्याचा अभिमान यावेळी केदार जाधव म्हणाला, "माझ्या घरच्या मैदानात, कुटुंबासमोर मी एक उत्तम खेळी करुन मी देशासाठी सामना जिंकला याचा मला अभिमान आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या संघाला जिंकवता, देशाचा अभिमान वाढवता, तेव्हा ती खूपच मोठी बाब असते". या सामन्यासाठी केदार जाधवचे आई-वडिल, पत्नी आणि मुलगीही आली होती. त्यांच्यासमोर केदार जाधवने शतक ठोकून त्यांना अनोखी मानवंदना दिली. केदार जाधवने 76 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकार ठोकत 120 धावा केल्या. संबंधित बातम्या