लंडन : श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने दिलेला स्फूर्तिदायी मंत्र, चॅम्पियन्स ट्रॉफीत श्रीलंकेच्या टीम इंडियावरच्या विजयाचं गमक असल्याची प्रतिक्रिया श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजनं व्यक्त केली.
संगकारा सध्या सरेकडून इंग्लिश कौंटीत खेळत असून, भारताविरुद्धच्या सामन्याआधी त्याने वेळ काढून श्रीलंकेच्या खेळाडूंशी संवाद साधला होता. संगकाराने खास मार्गदर्शन केलेल्या कुशल मेंडिसन या सामन्यात 89 धावांची खेळी उभारली. त्यामुळं श्रीलंकेच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना, अँजेलो मॅथ्यूज संगकाराचे आभार मानायला विसरला नाही.
इंग्लिश खेळपट्ट्यांवर कशी फलंदाजी करायची असते, याचं तंत्र श्रीलंकेच्या फलंदाजांना समजावून दिलं. तोच श्रीलंकेच्या भारतावरच्या यशाचा मंत्र ठरला. चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेकडून हार स्वीकारावी लागली होती. पण गुरुवारच्या सामन्यात श्रीलंकेने भारताच्या 322 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. आजवरच्या इतिहासात श्रीलंकेने केलेला तो दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी पाठलाग ठरला.
श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियावर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 322 धावांचं डोंगराएवढं लक्ष्य दिलं होतं. पण श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीवर हल्लाबोल करून त्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.
श्रीलंकेकडून गुणतिलका, कुशल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज यांनी अर्धशतकं झळकावली तर परेरा आणि गुणरत्नेनं ऐन मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत भारतावर दणदणीत विजय मिळवला. या पराभवामुळे भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफीमधील प्रवास अधिक खडतर झाला आहे.
सुरुवातीला भारताने फलंदाजी करत 321 धावा केल्या होत्या. शिखर धवनने झळकावलेलं शतक आणि त्यानं रोहित शर्मा, तसंच महेंद्रसिंग धोनीच्या साथीने रचलेल्या मोठ्या भागिदाऱ्यांनी टीम इंडियाला 50 षटकांत सहा बाद 321 धावांपर्यंत मजल मारता आली होती.
या सामन्यात शिखर धवन आणि रोहित शर्मानं 138 धावांची सलामी देऊन भारतीय डावाचा पाया रचला होता. धवनने धोनीच्या साथीने चौथ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी रचून भारतीय डावाला आणखी मजबुती दिली होती. रोहितनं 79 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांसह 78 धावांची खेळी केली होती.
हा सामना गमावल्यानं टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. त्यामुळे आता भारतासाठी पुढचा सामना ‘करो वा मरो’ असणार आहे.