Sikandar Shaikh News : पंजाबमध्ये भाड्याने घर घेतलं अन् नको नको ते केलं, अखेर जाळ्यात अडकला; महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, नेमकं काय घडलं?
Maharshtra kesari Sikandar Shaikh Arrested : कोल्हापूरच्या गंगावेश तालीममध्ये घडलेला आणि महाराष्ट्र केसरी जिंकणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख सध्या अडचणीत सापडला आहे.

Sikandar Shaikh Arrested News : कोल्हापूरच्या (Kolhapur) गंगावेश तालीममध्ये घडलेला आणि महाराष्ट्र केसरी जिंकणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख (Sikandar Shaikh Arrested) सध्या अडचणीत सापडला आहे. पंजाब पोलिसांनी त्याला शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केली आहे. सीआयए (CIA) पथकाने पपला गुर्जर गँगला शस्त्र पुरवणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड करत चार जणांना अटक केली असून त्यात सिकंदर शेखचाही समावेश आहे.
पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 99 हजार रुपये रोख रक्कम, 5 पिस्तुलं, काही काडतुसे आणि स्कॉर्पिओ-एन व एक्सयूव्ही अशा दोन गाड्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पंजाबमधील खरड येथील पोलिस ठाण्यात आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिकंदर शेखचा कुठल्या टोळीशी संबंध, नेमकं काय घडलं? (Maharshtra kesari Sikandar Shaikh Arrested)
एसएसपी हरमन हंस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अटक करण्यात आलेले आरोपी हरियाणा आणि राजस्थानमध्ये सक्रिय असलेल्या विक्रम उर्फ पपला गुर्जर गँगशी थेट जोडलेले आहेत. हे आरोपी उत्तर प्रदेशातून शस्त्र आणून पंजाब आणि आसपासच्या भागात विक्री करत होते. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी कारवाई केली आणि तपासादरम्यान समजले की, तिघे आरोपी गुन्हेगार पार्श्वभूमीचे आहेत. मात्र, महाराष्ट्रातील सिकंदर शेख याचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का, याची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला गेला आहे.
मुख्य आरोपी असलेल्या दानवीरवर खून अन् दरोड्याचे गुन्हे
तपासात उघड झाले की या प्रकरणातील मुख्य आरोपी दानवीरवर हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये खून, दरोडा, एटीएम फोडणे, आर्म्स अॅक्टसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो पपला गुर्जर गँगचा सक्रिय सदस्य असून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून शस्त्रं आणून पंजाबमध्ये विकण्याचे काम करायचा.
एअरपोर्ट चौकातून तिघांना पकडले अन्...
24 ऑक्टोबर रोजी दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी एक्सयूव्ही गाडीतून दोन पिस्तुलं घेऊन मोहालीत आले होते. ही शस्त्रं ते सिकंदर शेखकडे देणार होते, तर सिकंदरने ती नयागावच्या कृष्ण उर्फ हॅप्पीला देण्याचा प्लॅन केला होता. पोलिसांनी एअरपोर्ट चौकातून तिघांना पकडले आणि मिळालेल्या माहितीनुसार 26 ऑक्टोबर रोजी कृष्ण कुमार उर्फ हॅप्पीलाही अटक करण्यात आली. त्याच्याकडून आणखी तीन पिस्तुलं जप्त करण्यात आली.
महाराष्ट्र केसरी ते शस्त्र तस्करी
सिकंदर शेख हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा कुस्तीपटू असून त्याने आर्मीमध्ये क्रीडा कोट्यातून भरती घेतली होती. मात्र, काही काळानंतर त्याने नोकरी सोडली. तो बीए पदवीधर असून विवाहित आहे. गेल्या पाच महिन्यांपासून तो पंजाबमधील मुल्लांपुर गरीबदास येथे भाड्याच्या घरात राहत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, तो शस्त्र तस्करी साखळीत मध्यस्थाची भूमिका बजावत होता.
कुस्ती विश्वात खळबळ
कोल्हापूरच्या नामांकित गंगावेश तालीममध्ये प्रशिक्षण घेतलेल्या आणि दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र केसरी किताब पटकावलेल्या सिकंदर शेखच्या अटकेने कुस्ती विश्वात आणि संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा -
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई

























