Asian Games 2018 : इंडोनेशियातल्या एशियाडमध्ये महिला कबड्डीत सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेला इराणचा संघ आणि महाराष्ट्र यांचं खास नातं आहे. हे नातं आम्ही तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला धक्का बसेल. मग ऐका, हे नातं आहे गुरुशिष्यांचं. होय, इराणच्या एशियाड सुवर्णपदकविजेत्या संघाची बांधणी ही एका मराठमोळ्या प्रशिक्षिकेनं केली आहे. आणि एशियाडच्या मोहिमेत मुख्य प्रशिक्षिका या नात्याने त्या इराण संघासोबतच आहेत.

इराणच्या या महिला कबड्डी संघाच्या मुख्य प्रशिक्षिकेचं नाव आहे शैलजा जैन. गेली दीड वर्षे त्या मुख्य प्रशिक्षिका या नात्याने इराणच्या मुलींना कबड्डीचं मार्गदर्शन करत आहेत. शैलजा जैन यांना त्यांच्या शिष्यांनी आज एशियाड सुवर्णपदकाची गुरुदक्षिण दिली.

शैलजा जैन यांचं लग्नाआधीचं नाव शैलजा धोपाडे. त्या मूळच्या विदर्भातल्या असून, त्यांनी राष्ट्रीय कबड्डीत विदर्भाचंच प्रतिनिधित्व केलं आहे. शैलजा या लग्नानंतर नाशिकमध्ये स्थायिक झाल्या, पण त्यांनी नव्या शहरातही कबड्डीची नाळ तुटू दिली नाही. नाशिकमधल्या रचना क्लबच्या त्या प्रशिक्षिका आहेत. भक्ती कुलकर्णी आणि निर्मला भोई यांच्यासारख्या अनेक उत्तमोत्तम कबड्डीपटू त्यांनी घडवल्या आहेत.

शैलजा जैन यांनी खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर, एनआयएसमधून प्रशिक्षणाचा एक वर्षाचा कोर्स केला. त्यानंतर त्या कबड्डी प्रशिक्षिका म्हणून राज्य शासनाच्या सेवेत रुजू झाल्या. शैलजा जैन यांना कबड्डी प्रशिक्षणात इतका रस आहे की, त्यांनी 2004 साली मिळालेली बढतीची पहिली संधी नाकारली. त्यात खूप त्यांचं आर्थिक नुकसान झालं. शैलजा यांनी अखेर 2014 साली बढती स्वीकारली, पण शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांना तुलनेत कमी निवृत्तीवेतन मिळतं. कारण त्यांनी तब्बल दहा वर्षे उशिराने बढती स्वीकारली.

शैलजा जैन या दोन-तीन वर्षांपूर्वीच राज्य शासनाच्या सेवेतून निवृत्त झाल्या आहेत. पण निवृत्त झाल्यानंतरही त्या स्वस्थ बसलेल्या नाहीत. कबड्डी प्रशिक्षक म्हणून त्या कार्यरतच राहिल्या. कबड्डी प्रशिक्षणात असलेल्या त्या गोडीने शैलजा जैन यांना इराणच्या महिला संघाला मार्गदर्शन करण्याची संधी मिळवून दिली. शैलजा जैन यांच्या मार्गदर्शनानं इराणच्या मुलींना आजा एशियाड कबड्डीचं सोनं जिंकून दिलं आहे.