Maharashtra Mini Olympic : पुण्यात शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरची नेमबाज अनुष्का पाटीलने 50 मीटर फ्री पिस्तल गटात कांस्यपदक पटकावले. अनुष्काने 50 मीटर फ्री पिस्तल गटात 600 पैकी 519 गुण प्राप्त करत राज्य ऑलम्पिक स्पर्धेत वैयक्तिक कांस्यपदक मिळवले. अनुष्काने या अगोदर जर्मनीमधील जागतिक ज्युनिअर नेमबाजी स्पर्धेत व इराणमधील आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताला सांघिक सुवर्णपदक मिळवून दिले आहे. अनुष्काने विविध राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत मिळून आतापर्यंत 107 पदकांची कमाई केली आहे. 


अनुष्का कोल्हापुरात गोखले महाविद्यालयात बी.एस्सी कम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत असून तिला संस्थेचे सेक्रेटरी जयकुमार देसाई, मंजिरी मोरे देसाई ,उपाध्यक्ष सावंत सर, प्राचार्य भुयेकर,क्रीडाशिक्षक कांबळे सर यांचे तसेच उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. अनुष्का  पुणे क्रीडा प्रबोधिनीची अनिवासी खेळाडू आहे. तिला प्रबोधिनीचे प्राचार्य सुहास पाटील, नवनाथ फडतरे, संदीप तरटे, जीएफजी ऑलम्पिक खेळाडू गगन नारंग, प्रशिक्षक सी.के.चौधरी, अब्दुल कय्युम, विनय पाटील, युवराज चौगुले यांचे मार्गदर्शन लाभत आहे. 


दरम्यान, 39 विविध क्रीडा प्रकारांमध्ये जवळपास 8 हजार खेळाडू राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेमध्ये (Maharashtra Mini Olympic) सहभागी झाले आहेत.  2 जानेवारीपासून स्पर्धेला प्रारंभ झाला असून त्या 12 जानेवारीपर्यंत चालणार आहेत. या स्पर्धेमध्ये औरंगाबाद, जळगाव, अमरावती, मुंबई, नागपूर अशा विविध भागांमधून 207 अव्वल नेमबाजांनी रायफल व पिस्तूल स्पर्धेत भाग घेतला आहे. 


तेजस्विनी सावंतला सुवर्णपदक; महिला कुस्तीपटूंची दमदार कामगिरी


दरम्यान, मंगळवारी कोल्हापूरची ऑलिम्पियन तेजस्विनी सावंत आणि रत्नागिरीच्या पुष्कराज इंगोले यांनी 50 मीटर रायफल प्रोन महिला आणि पुरूष नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक गेम्समध्ये (Maharashtra Mini Olympic) पहिली दोन सुवर्णपदके पटकावली होती. 


महिला कुस्तीमध्ये कोल्हापूरच्या कुस्तीपटूंनी मंगळवारी ऑफर केलेल्या पाचपैकी तीन सुवर्णपदके जिंकून वर्चस्व गाजवले. वरिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियन नंदिनी साळोखे हिने नेहा चौघुले हिला पराभूत करून जिल्ह्याच्या सुवर्णपदकाची सुरूवात केली. 55 किलो वजनी गटाच्या अंतिम राउंडमध्ये विश्रांती पाटीलने सांगलीच्या अंजली पाटीवर वर्चस्व राखून कोल्हापूरसाठी दूसरे सुवर्णपदक मिळविले. कोल्हापूर शहराचे प्रतिनिधित्व करणार्‍या अमृत पुजारीने त्यानंतर जिल्ह्यातील सृष्टी भोसलेचा पराभव करत 65 किलो वजनी सुवर्णपदक जिंकले. (Maharashtra Mini Olympic)


इतर महत्वाच्या बातम्या