Maharashtra Kesari 2025: महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या (Maharashtra Kesari 2025) उपांत्य फेरीचे पंच नितीश कबालिये यांचं 3 वर्षांसाठी निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी याबाबत माहिती दिली आहे. अहिल्यानगरमध्ये 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान 67 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडल्या होत्या. यामध्ये गादी विभागातील अंतिम फेरीच्या कुस्तीमध्ये पृथ्वीराज मोहोळविरुद्ध शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) यांच्या चितपटीच्या निर्णयावरुन मोठा गदारोळ निर्माण झाला होता.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष रामदास तडस काय म्हणाले?
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने 67वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर येथे पार पडली होती. सेमी फायनलच्या गादीच्या कुस्तीमध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांची कुस्ती झाली. त्यामध्ये पृथ्वीराज मोहोळ विजयी झाला. त्या ठिकाणी वाद झाला बाद झाल्यानंतर त्या ठिकाणी तीन पंच तीन साईड पंच एक पंच अशी चार जणांची समिती राहते. त्या ठिकाणी आम्ही चौकशीला पुढे जाण्याकरीता एक कमिटी नेमली विलास कचुरे आंतरराष्ट्रीय पंच आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही कमिटी नेमली. त्या कमिटीमध्ये शिवराज राक्षे तर दोषी आहेच, परंतु त्या ठिकाणी नितीश कबलीये हा पंच दोषी आढळले आहेत. त्यामुळे पंच नितीश कबलीये यांना देखील तीन वर्षासाठी आम्ही निलंबध केलं आहे. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कुठेही त्यांना पंचगिरी करता येणार नाही, असं रामदास तडस यांनी सांगितले. त्यांनी सात दिवसात अहवाल सादर करावा. तर पुन्हा आम्ही कमिटी नेमू आणि त्यात दोषी नसेल तर पुन्हा विचार होईल. आज मात्र तीन वर्षासाठी पंच सतीश कबालिये यांना निलंबन केले आहे, अशी माहिती रामदास तडस यांनी दिली.
नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला शेवटच्या दिवशी (2 फेब्रुवारी 2025) गालबोट लागले. गादी विभागातील अंतिम लढतीत पराभूत घोषित केल्याचा पंचाचा निर्णय अमान्य करत नांदेड येथील पैलवान शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) याने आखाड्यातच पंचाची कॉलर पकडली. त्यांना लाथही मारली. त्यामुळे कुस्तीच्या मैदानावर एकच गोंधळ उडाला. याप्रसंगी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत शिवराज राक्षे व त्याच्या सहकाऱ्यांना मैदानाबाहेर काढले. तसेच घडलेल्या या प्रकरानंतर शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले.
