हैदराबाद : महाराष्ट्राच्या पुरुष संघाने तब्बल अकरा वर्षांनी राष्ट्रीय कबड्डीचं विजेतेपद पटकावलं आहे. महाराष्ट्राच्या कबड्डी संघाने सेनादलाचा 34-29 असा निसटता पराभव करुन यावर्षीच्या राष्ट्रीय कबड्डीच्या चषकावर आपलं नाव कोरलं आहे.


महाराष्ट्रानं 2006 साली अमरावतीत झालेल्या राष्ट्रीय कबड्डीत पुरुषांचं विजेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर महाराष्ट्राला विजेतेपदानं कायम हुलकावणी दिली. अखेर यंदा  हैदराबादमध्ये झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. रिशांक देवाडिगाच्या नेतृत्त्वाखालील महाराष्ट्रानं उपांत्य फेरीत कर्नाटकवर, तर अंतिम फेरीत सेनादलावर मात केली.

महाराष्ट्राकडून या स्पर्धेत रिशांक देवाडिगासह गिरीश इर्नाक, विराज लांडगे, ऋतुराज कोरवी आणि नितीन मदने यांनी लक्षवेधक कामगिरी बजावली. या विजयानंतर मुख्यमंत्र्यांनीही ट्विट करत महाराष्ट्राच्या कबड्डी संघाचं अभिनंदन केलं आहे.