Instagram Highest Earners List : फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 (FIFA World Cup) विजेत्या संघाचा कप्तान लिओनेल मेस्सी (Lionel Messi) फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला (Cristiano Ronaldo) इंस्टाग्रामवरील कमाईच्या बाबतील मागे टाकण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये रोनाल्डोने प्रत्येक ब्रँड पोस्टसाठी 2 मिलियन पाउंड (सुमारे 19.69 कोटी) कमावले. ही कमाई मेस्सीपेक्षा जास्त आहे. मेस्सीने 2022 वर्षात एका पोस्टसाठी 1.5 मिलियन पाउंड (सुमारे 14.77 कोटी) फी आकारली होती. दरम्यान, भारताचा स्टार क्रिकेटपटू 'हिट मशीन' विराट कोहली (Virat Kohli) इंस्टाग्रामवरील कमाईच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2022 मध्ये विराटने इंस्टाग्रामवरील एका पोस्टमधून 902,000 पाऊंड (सुमारे 8.88 कोटी) कमावले. कतारमध्ये झालेल्या विश्वचषकात मेस्सीने आपल्या शानदार खेळाने प्रायोजकांना खळबळ माजवली होती.


गेल्या तीन आठवड्यांमध्ये मेस्सीच्या कमाईत वाढ


गेल्या तीन आठवड्यांत, लिओनेल मेस्सीने त्याच्या इंस्टाग्रामवरून सर्व प्रकारच्या स्पॉन्सर्सड पोस्ट शेअर केल्या आहेत. यामध्ये बडवायजर (Budweiser) बिअर, कॉम्प्युटर गेम कॉल ऑफ ड्यूटी, इ-फुटबॉल (eFootball), एनर्जी ड्रिंक गेटोरेड, क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज बिटगेट आणि प्रोस्थेटिक आयवेअर मेकर ऑर्कॅमच्या जाहिरातींचा समावेश आहे. मेस्सीच्या या सर्व पोस्ट्सवरून तुम्ही अंदाज लावू शकता की मेस्सीच्या इंस्टाग्रामवरील कमाईत मोठी वाढ झाली आहे.


रोनाल्डोही झाला मालामाल


दुसरीकडे, फिफा विश्वचषक हरल्यानंतर फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) त्याच्या कमाईमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो याने सौदी अरेबियाच्या अल-नसर क्लबसोबत करार केला आहे. रोनाल्डोने युरोपचा फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड सोडला असून तो आता सौदी अरेबियाच्या फुटबॉल क्लब AlNassr सामील झाला आहे. अल-नासर रोनाल्डला एका वर्षासाठी 173 दशलक्ष पाऊंड (1800 कोटी रुपये) रक्कम देईल. हा करार क्रीडा जगतातील सर्वात महागडा करार असल्याचं म्हटलं जात आहे.


मेस्सीच्या सर्वाधिक लाइक केलेल्या पोस्टचा विक्रम


फिफा विश्वचषक जिंकल्यानंतर लिओनेल मेस्सीने इंस्टाग्रामवर सर्वाधिक लाइक केलेल्या फोटोचा विक्रमही आपल्या नावावर केला. विश्वचषक ट्रॉफी उंचावतानाच्या फोटोने 75 दशलक्ष लाईक्सचा आकडा गाठला. हा फोटो इंस्टाग्रामवर सर्वाधिक लाइक केलेला फोटो आहे. रोनाल्डो आणि मेस्सीचे इंस्टाग्रामवर फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. ख्रिस्तियानो रोनाल्डो 529 दशलक्ष (529 Million) इंस्टाग्राम फॉलोअर्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. तर लिओनेल मेस्सीचे इंस्टाग्रामवर 415 दशलक्ष (415 Million) फॉलोअर्स आहेत.


विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर


भारतीय स्टार क्रिकेटर विराट कोहलीचे 230 दशलक्ष (230 Million) फॉलोअर्स आहेत. कोहली इंस्टाग्राम कमाईच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीनंतर फुटबॉलपटू नेमार हा इंस्टाग्राम कमाईच्या बाबतीत चौथा खेळाडू आहे. यानंतर बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स पाचव्या क्रमांकावर आहे. हे टॉप-5 खेळाडू इंस्टाग्राम कमाईत पुढे आहेत.